

रत्नागिरी : एकीकडे इस्रायल विरूध्द इराण हे युद्धाचा परिणाम आता सर्वत्र जाणवू लागला आहे. राज्यात लागू झालेल्या नवीन धोरणामुळे ग्रामीण भागात 45 दिवस एलपीजी सिलिंडर उपलब्ध होणार नाही. या पार्श्वभूमीवर शासनाने अंत्योदय व प्राधान्य गटातील पात्र शिधापत्रिकारधारकांना केरोसीनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लाखो पात्र कुटुंबांना आता रेशन दुकानातच नाही तर अधिकृती पेट्रोल पंपावरही रॉकेल उपलब्ध होणार आहे. दरम्यान, जिल्हा पुरवठा विभागाने लाभार्थ्यांचा तपशील सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली असून यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गॅस सिलिंडर वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना पुन्हा पारंपरिक इंधनाकडे वळावे लागले आहे. याबाबत राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी विधिमंडळात केरोसीन वितरणाबाबत घोषणा केली आहे. गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात गॅसऐवजी चुली पेटू लागल्या आहेत. या परिस्थितीवर उपाय म्हणून आता शासनाने अंत्योदय व प्राधान्य कुटूंबातील पात्र शिधापत्रिकाधारकांना केरोसीन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडे रत्नागिरी जिल्ह्यातील 7 लाखांहून अधिक कुटुंबांची नोंद आहे.