

रत्नागिरी : ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे भात, नाचणी पिके धोक्यात आली होती. मात्र सप्टेंबर महिन्यात पाऊस परतला आहे. दमदार पावसामुळे भात, नाचणी पिकांना दिलासा मिळाला आहे. चोवीस तासात ६८.३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुहागर, चिपळूण, संगमेश्वर व लांज्जात पाऊस जास्त पडत आहे.
जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ३ हजार ३६४ मिमी इतका पाऊस पडत असतो. दरम्यान, तीन महिन्यात आतापर्यंत २ हजार ४६२ मिमी इतका पाऊस झाला आहे, तर गतवर्षी ३ हजार २८४ इतका पाऊस पडला होता. मात्र यंदा जून आणि ऑगस्ट महिन्यांनी मोठी निराशा केली असून म्हणावा तितका पाऊस झालाच नाही. भात, नाचणी पिके चांगल्या पध्दतीने बहरली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात पाऊस न झाल्यामुळे भात पिकांवर कीडरोग पडत असल्याचे सांगण्यात आले होते.
दरम्यान, सप्टेंबर उजाडला असून मंगळवार, बुधवारी पावसानेही चांगली सुरूवात केली आहे. रात्री, सकाळी पाऊस पडत आहे, तर दुपारच्या वेळी उन्हाचे दर्शन होत आहे. पावसाने चांगली सुरूवात केल्यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे.