Ratnagiri : जिल्हा बँकेची दीड ते सात हजारपर्यंत वेतनवाढ

संघटनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांची माहिती; बँकेचा झाला वेतन करार
Ratnagiri News
जिल्हा बँकेची दीड ते सात हजारपर्यंत वेतनवाढ
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि को. ऑपरेटीव्ह बँक्स एम्प्लाईज युनियन यांच्यामध्ये शुक्रवारी पुढील चार वर्षांसाठी वेतन करार झाला. यामध्ये कर्मचार्‍यांना विविध सुविधांसह वेतनात 1500 ते 7000 हजार रुपयांपर्यंत वाढ मिळणार असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांनी दिली. या वेतन करारामुळे कर्मचार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचार्‍यांचा वेतन कराराची मुदत डिसेंबर 2024मध्ये संपली होती. त्यानंतर वेतन करार झाला नव्हता. आठ महिन्यानंतर वेतन करार झाला आहे. हा करार पुढील चार वर्षासाठी असणार आहे. या करारानंतर पत्रकार परिषदेत बोलताना आनंदराव अडसूळ म्हणाले की बँकेला यावर्षी 94 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या वाटचालीत कर्मचारी नेहमीच चांगली भूमिका बजावत आले आहेत. मात्र नफा किती वाढला तरी बँक चालवताना, बँकेला काय परवडेल याचा विचारही वेतन करार करताना करण्यात आला आहे. मागील कराराप्रमाणेच हा करार करण्यात आला असून, याला संचालक मंडळाने सहकार्य केले आहे. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे व सहकार्‍यांनी कर्मचार्‍यांसाठी चांगली भूमिका घेतली आहे. अनेक सुविधांना मान्यता दिली आहे. कर्मचार्‍यांना चार टक्के व्याजाने 75 लाखापर्यंत घरकर्ज, 4.5 टक्के व्याजाने वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, मेडीक्लेम, गॅॅ्रज्युएटी या सारख्या सुविधांचा लाभ करारामुळे मिळणार आहे. नवीन कर्मचार्‍यांना दीड हजार रुपये तर जुन्या कर्मचार्‍यांना सात हजार पर्यंत वेतनवाढ मिळणार असल्याचे अडसूळ यांनी सांगितले.

रिझर्व्ह बँकेच्या सध्याच्या ध्येयधोरणा विषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. रिझर्व्ह बँकेचे नॉर्म्स हे बँकांना त्रासदायक ठरत आहेत. केंद्र सरकारचे सहकार विषय धोरण चांगले असल्याचेही त्यांनी सांगितले. सहकार खाते पूर्वी कृषी खात्याशी संलग्न होते. मात्र सहकार विभागाची व्याप्ती लक्षात घेतल्यानंतर केंद्र शासनाने सहकार खाते वेगळे करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरु आहे. सहकारी उद्योगाला पूरक धोरण असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील साळवी व पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news