

देवरुख : सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, फेसाळणारा धबधबा, निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण करणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील पूर गावातील ओझर धबधब्याला पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी देवरूख येथील क्रांती व्यापारी संघटनेने पुढाकार घेतला आहे. ‘देवनगरी देवरूख पर्यटन प्रकल्पा’अंतर्गत ओझर धबधबा व सप्तलिंगी नदी परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तब्बल ७ कोटी ८० लाख रुपयांचा प्राथमिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला असून, हा प्रस्ताव आमदार शेखर निकम यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
आमदार निकम यांनी यापूर्वी ओझर धबधबा परिसराला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्य पाहून ओझरचा उल्लेख ‘देवरूखचे मिनी नायगारा’ असा केला होता. तसेच याठिकाणी ग्लास ब्रिजसह पर्यटन सुविधा विकसितसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे ओझरच्या पर्यटन विकासाच्या अपेक्षांना नवी चालना मिळाली आहे. ओझर धबधबा व सप्तलिंगी नदीचे विहंगम दर्शन घडविणारा आधुनिक ‘सिग्नेचर ग्लास स्कायवॉक’ होय. केवळ नदीवर पूल उभारण्याऐवजी निसर्गाच्या सान्निध्यात उंचावरून धबधबा व नदीचे सुरक्षित दर्शन घेता येईल, अशी वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना मांडण्यात आली आहे.
यामध्ये कँटिलिव्हर किंवा यू-आकाराचा ग्लास स्कायवॉक, काचेचे व्ह्यूइंग पॅनेल्स आणि ३६० अंशांतून परिसराचे दर्शन घडविणारा व्ह्यूइंग डेक उभारण्याची संकल्पना आहे. प्रत्यक्ष रचना, लांबी आणि खर्च हे तांत्रिक सर्वेक्षण, भू-अभियांत्रिकी तपासणी आराखड्यानंतर निश्चित केले जाणार आहेत. ग्लास स्कायवॉकसाठी प्राथमिक स्तरावर अडीच कोटीची तरतूद प्रस्तावित आहे.
ओझरच्या पर्यटन विकासात ग्लास स्कायवॉकइतकेच महत्त्व ‘रिव्हर व्ह्यू गार्डन अँड लँडस्केप डेव्हलपमेंट’ला देण्यात आले आहे. आकर्षक उद्यान विकसित करण्याची संकल्पना या आराखड्यात मांडली आहे. या उद्यानात नदी व धबधब्याचे दर्शन घडविणारे पॅनोरॅमिक व्ह्यू डेक, निसर्गाच्या सान्निध्यातील पायवाटा, आकर्षक फोटो पॉइंट्स, सावलीतील बैठक व्यवस्था, विश्रांती क्षेत्र आणि स्थानिक वनस्पतींचे संवर्धन यांचा समावेश असेल. विविध आकर्षक फोटो पॉइंट्समाधून या पर्यटन स्थळाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची योजना आहे. यासाठी १ कोटीचा प्राथमिक खर्च प्रस्तावित आहे. संगीत कारंजे आणि नियंत्रित विद्युत रोषणाई विकसित करण्याचाही प्रस्ताव आहे. यासोबतच महिला, पुरुष व दिव्यांगांसाठी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहनतळ, अंतर्गत रस्ते, पर्यटन माहिती केंद्र, सीसीटीव्ही, प्राथमिक उपचार सुविधा, कचरा व्यवस्थापन आणि सौरऊर्जेच्या पर्यायांचाही आराखड्यात समावेश आहे.
यासाठी प्राथमिक अंदाजित खर्च ग्लास स्कायवॉक २.५० कोटी, रिव्हर व्ह्यू गार्डन व लँडस्केप १ कोटी, व्ह्यू पॉइंट, वॉकिंग ट्रॅक व सुरक्षा कठडे ४५ लाख, विद्युत रोषणाई ५५ लाख, म्युझिकल फाउंटन व लाईट शो ६५ लाख, स्वच्छतागृहे २५ लाख, पिण्याचे पाणी व जलव्यवस्था २ लाख, वाहनतळ व अंतर्गत रस्ते ४० लाख, पर्यटन माहिती केंद्र २० लाख, सुरक्षा, सीसीटीव्ही व प्राथमिक उपचार २५ लाख, कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धन १६ लाख, प्रवेशद्वार, दिशादर्शक फलक व सुशोभिकरण २२ लाख, विद्युत पायाभूत सुविधा व सौरव्यवस्था २० लाख, सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR), सर्वेक्षण, तांत्रिक सल्ला व आकस्मिक तरतूद ६५ लाख असा एकूण प्राथमिक अंदाजित खर्च ७ कोटी ८० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर, उपाध्यक्ष इस्तियाक कापडी, सचिव नंदकिशोर बेर्डे, कार्याध्यक्ष नितीन हेगशेट्ये, खजिनदार उदय जागुष्टे व सहसचिव संदीप वेल्हाळ आदींच्या वतीने हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.