

खेड : रत्नागिरी व देवगड हापूसला ‘कोकणचा राजा’ म्हणून ओळख मिळवून देणार्या उत्पादनाला ऐन हंगामातच कर्नाटकी आंब्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या वर्षी लहरी हवामानामुळे कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन घटले असताना, कर्नाटकी विक्रेते 2200-2400 रुपये शेकडा दराने आंबा विकत असल्याने कोकणातील रत्नागिरी- सिंधुदुर्ग- रायगडमधील बागायतदार आणि स्थानिक व्यापारी मोठ्या आर्थिक तोट्यात आले आहेत.
खेडच्या बाजारात रत्नागिरी हापूस 3 हजार रुपये शेकडा विक्री होत असतानाच, काही व्यापारी कर्नाटकी आंब्याला ‘हापूस’ म्हणून पेटीत भरून पारंपरिक विक्रेत्यांची फसवणूक करत आहेत. ग्राहकांना रत्नागिरी हापूसची खात्री देत कर्नाटकी आंबा विकला जात आहे, अशी तक्रार स्थानिक आंबा विक्रेत्यांनी केली आहे. या प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी हापूस आंबा बागायतदारांकडून केली जात आहे.
पारंपरिक हापूस योग्य दरात विकता येत नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे. खासकरून रत्नागिरी आणि देवगड या जिल्ह्यांतून निर्यातीवरही परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक बाजार समित्या कर्नाटकी आंब्याच्या प्रवेशावर प्रतिबंध आणण्यास अपयशी ठरल्या आहेत तर सरकारने घोषित केलेले हमीभाव अद्याप अंमलात येण्यासाठी वाट पाहत आहेत.
काही विक्रेते हापूसच्या नावावर कर्नाटकी आंबा विकत असल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी जिल्हा प्रशासनाला कळवले आहे. या बाबतीत योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. बाहेरील आंबा पेटीवर रत्नागिरी हापूस लावून विकणे हा स्थानिक उत्पादनावर थेट हल्ला आहे. प्रशासनाकडे यासाठी ठोस नियमन करणे अपेक्षित आहे, असे रत्नागिरी येथील आंबा बागायतदारांचे म्हणणे आहेे.