

चिपळूण : चिपळूण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र, चिपळूणमध्ये प्रत्येकवेळी आल्यावर विकासासाठी येथील लोकप्रतिनिधी पक्षभेद विसरून एकाच व्यासपीठावर येतात. महाराष्ट्रासाठी ही ओळख महत्त्वाची आहे. त्यामुळे विकास हाच आमचा पक्ष आहे. आचारसंहिता संपल्यावर आम्ही विकासासाठी संपूर्ण जिल्ह्यात असेच एकत्र राहू आणि चिपळूण विकासाला भरघोस निधी देऊ, असे आश्वासन पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण न.प.च्या इमारत बांधकाम भूमीपूजनप्रसंगी दिले.
शुक्रवारी सायंकाळी उशिरा चिपळूण न.प. येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा भूमीपूजन सोहळा झाला. यावेळी आमदार भास्कर जाधव, आ. शेखर निकम, जि. प. अध्यक्षा अस्मिता केंद्रे, माजी आ. सदानंद चव्हाण, रमेश कदम, संजय कदम, शशिकांत चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्षा डॉ. रूपाली दांडेकर, मुख्याधिकारी संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यासाठी चिपळूणमधील आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. सामंत म्हणाले, वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून चिपळूण न.प.ची सुसज्ज इमारत होत आहे. ७० वर्षे टिकणारी दर्जेदार वास्तू या निमित्ताने उभी राहावी. रत्नागिरीमध्ये न.प.ची भव्य वास्तू उभी राहिली आहे. रत्नागिरीप्रमाणे चिपळूणमधील वास्तूही राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकासासाठी सर्वपक्षिय एकजूट हाच आमचा पक्ष आहे. आज व्यासपीठावर सर्वच पक्षांचे नेते आहेत. राजकीय मतभेद विसरून विकासासाठी कसे एकत्र यायचे हे चिपळूणने अनेकदा दाखवून दिले आहे. याचे उदाहरण आपण कोकणासह राज्यात सांगत असतो. त्यातून राज्यात चांगला संदेश जातो. चिपळूणचा हा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राज पोहोचावा, असे गौरवौद्गार त्यांनी काढले.
चिपळूण रत्नागिरीसाठी एसडीआरएफच्या धर्तीवर 25 प्रशिक्षित जवानांच्या दोन तुकड्या लवकरच तयार केल्या जाणार आहेत. आपत्ती निवारणासाठी ही पथके काम करतील. सिंधुरत्न योजनेतून त्याला निधी देण्यात येईल, असे यावेळी पालकमंत्र्यांनी जाहीर केले. शहराच्या विकासासाठी केवळ जिल्हा नियोजन मंडळावर अवलंबून न राहता राज्य नगरोत्थान योजनेतून चिपळूणला मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला जाईल. त्यासाठी आपण स्वतः या शिवाय येथील सर्वपक्षिय स्थानिक लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष आदींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे जावू, असा शब्द दिला.
चिपळूण शहरासाठी आधुनिक ड्रेजने सिस्टीम, नानासाहेब जोशी रस्त्यासाठी १५ कोटींचा निधी, मुंबई-गोवा महामार्गालगत सवतसडा धबधबा परिसराचा विकास, वाशिष्ठी नदीचा पर्यटनदृष्ट्या विकास याचे सर्व पारदर्शक व दर्जेदार डीपआर तयार करून निधी मंजूर करण्याची जबाबदारी आपण घेतली, असेही जाहीर केले. सफाई कामगारांसाठी गणवेश, बूट व आदी साधने जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून केली जातील, असे सांगितले. यावेळी आ. भास्कर जाधव यांनी, विकासकामात आपण कधीही राजकारण आणले नाही. याचवेळी त्यांनी सवतसडा धबधबा बारमाही वाहण्यासाठी आपण प्रस्ताव दिला आहे. तसेच गोवळकोट ते परशुरामपर्यंत केबल कार प्रकल्पाचा पाठपुरावा आपण केला आहे. राजकीय मतभेद वैचारिक असावेत, व्यक्तीगत नसावेत. विकासासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत, अशी ग्वाही दिली.
यावेळी आ. शेखर निकम यांनी, चिपळूण न.प.च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त पालिकेला दीडशे कोटी रूपयांचा अतिरिक्त निधी द्यावा, अशी मागणी व्यासपीठावरून केली. येथील नगराध्यक्ष उमेश सकपाळ अनेक विकासाच्या योजना मांडत आहेत. त्याला महायुती सरकारने निधी देऊन चिपळूणचा कायापालट करावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांनी चिपळूणसाठी दिलेल्या भरीव निधीची आठवण करून दिली.
यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनीदेखील चिपळूणच्या विकासासाठी आणि स्मार्ट सिटी करण्यासाठी पालकमंत्र्यांनी मार्गदर्शनासह भरीव निधी द्यावा, अशी मागणी केली, शशिकांत मोदी यांनी आभार मानलेे.