

प्रवीण शिंदे
दापोली : हापूस आंब्याच्या बागेत केवळ आंब्याचे उत्पादन न घेता त्याच जमिनीवर पूरक उत्पन्नाचा मार्ग शोधण्याचा प्रयोग कात्रण येथील मळेकर पिता-पुत्रांनी केला आहे. पांडुरंग मळेकर आणि त्यांचे चिरंजीव आकाश मळेकर यांनी रुखी गावातील एका शेतकऱ्याची हापूस आंबा बाग कराराने घेतली असून या बागेत आंतरपीक म्हणून ५ हजारांहून अधिक झेंडूच्या रोपांची लागवड केली आहे. सध्या ही झेंडूची शेती फुलांनी बहरली आहे.
मळेकर कुटुंबीय हापूस आंब्याच्या बागेची नियमित देखभाल करतात. बागेतील आंब्याच्या झाडांमधील उपलब्ध जागेचा योग्य वापर व्हावा आणि आंब्याच्या उत्पन्नाला जोड मिळावी, या उद्देशाने त्यांनी झेंडू लागवडीचा प्रयोग केला. योग्य मशागत, खत व्यवस्थापन आणि नियमित निगा राखल्याने झेंडूची रोपे चांगली वाढली असून सध्या बागेत पिवळ्या-केशरी फुलांची आकर्षक उधळण पहायला मिळत आहे.
आंबा हे कोकणातील प्रमुख पीक असले तरी त्या सोबत आंतरपीक घेऊन उपलब्ध जागेतून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा हा प्रयोग आहे. विशेष म्हणजे स्वतःची जमीन नसतानाही कराराने घेतलेल्या बागेत मळेकर पिता-पुत्रांनी हा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. झेंडूच्या फुलांचा बहर पाहता या पिकातून चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. कात्रणच्या या पिता-पुत्रांनी रुखी येथे केलेला प्रयोग तालुक्यातील आंबा बागायतदारांसाठी निश्चितच लक्षवेधी ठरत आहे.