Ratnagiri News : जिल्‍ह्यात ८,३४५ शेतकऱ्यांच्‍या २,६०१ हेक्टर पिकांचे पंचनामे

रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर तीन तालुके पहिल्‍या ट्रीगरमध्ये; पालकमंत्री सामंत यांच्या आदेशाने ९ तालुक्यांत पंचनामे सुरू
Crop Damage
जिल्‍ह्यात ८,३४५ शेतकऱ्यांच्‍या २,६०१ हेक्टर पिकांचे पंचनामे
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : खरीप हंगामात कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तीन तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. उर्वरित सहा तालुक्‍यात ही दुष्काळाची परिस्‍थिती असल्‍यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांच्‍या आदेशाने जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने नऊ तालुक्यांमध्ये दुष्काळी पिकांचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत २ हजार ६०१ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले असून, ८ हजार ३४५ शेतकरी यामध्ये समाविष्ट झाले आहेत. येत्‍या काही दिवसात लवकरच पंचनामे पूर्ण होणार असल्‍याचे सांगण्यात आले.

यंदाच्‍या वर्षी जिल्‍ह्यात म्‍हणावा तसा पाऊस झाला नाही. मान्‍सून वेळेत दाखल झाला मात्र जून महिन्‍यात पाच दिवस आणि जुलै महिन्‍यात पहिले सात दिवस आणि काही दिवस पाऊस झाला. ऑगस्‍ट, सप्‍टेंबर या दोन महिन्‍यात पावसाने निराशा केली. त्‍यामुळे भात, नाचणीचे पिके बहरली असताना ऐन काढणीच्‍या वेळेला पाऊस नसल्‍यामुळे पिके पिवळी पडू लागली आहेत. रोपाची वाढ खुंटली , पाती करपली तर लोंबी बाहेर पडत आहेत.

अल निनोच्‍या प्रभावामुळे रत्‍नागिरी जिल्‍ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्‍यामुळे भात पिक धोक्‍यात आले आहे. तब्‍बल ३५ टक्‍के उत्‍पादन घटणार असल्‍याचे सांगण्यात आले. राज्य शासनाने कमी पावसामुळे रत्नागिरी, राजापूर आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानंतर उर्वरित तालुक्यांमध्येही दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन पंचनाम्याची कार्यवाही करण्यात येत आहे. पंचनाम्यांमध्ये संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक ५२५ हेक्टर, तर राजापूरमध्ये ४६३.३५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. दापोलीत ३२५.१०, रत्नागिरीत ३०६.८२, चिपळूणमध्ये २८०.५०, लांजामध्ये २०२.२४, मंडणगडमध्ये १७५.२७, खेडमध्ये १७०.४५ आणि गुहागरमध्ये १५२.३५ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या पंचनाम्यामुळे दुष्काळी परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची माहिती प्रशासनाकडे संकलित होत असून, शासनाच्या निकषानुसार पुढील मदत व नुकसानभरपाईची कार्यवाही होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

भात उत्‍पादन घटणार

जिल्‍ह्यात सुरूवातीला चांगला पाऊस येवूनसुध्दा ऑगस्‍ट, सप्‍टेंबर महिन्‍यात पाऊस झालाच नाही. त्‍यामुळे भात शेती धोक्‍यात आली आहे. पिके करपत असून पिवळी पडत आहेत. लोंबी बाहेर पडलली आणि दाण्याऐवजी चिम झाली आहे. त्‍यामुळे यंदा भाताचे उत्‍पादन ३० ते ३५ टक्‍क्‍यांनी घटणार असल्‍याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news