

खेड : खेड तालुक्यात धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून महिला व तिच्या दीड वर्षाच्या मुलाला खाली ढकलल्याच्या धक्कादायक घटनेप्रकरणी अखेर खेड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत २५ वर्षीय शुभा अतिश दिवेकर यांचा मृत्यू झाला असून त्यांचा दीड वर्षाचा मुलगा अद्वैत जखमी झाला आहे. या प्रकरणी सचिन सत्यवान जुवळे (२९, रा. कोतवली, ता. खेड) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७.५० वाजण्यापूर्वी चिपळूणहून मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमध्ये शुभा दिवेकर, त्यांचा दीड वर्षाचा मुलगा अद्वैत आणि आरोपी प्रवास करत होते. अंजनी रेल्वे स्थानकाजवळ आरोपीने शुभा व अद्वैत यांना धावत्या रेल्वेतून खाली ढकलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या घटनेत शुभा दिवेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अद्वैतच्या चेहऱ्यावर व पायावर किरकोळ दुखापती झाल्या असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. घटनेनंतर आरोपीनेही स्वतः धावत्या रेल्वेतून उडी मारल्याचे समोर आले असून त्याच्यावरही उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी शुभाचे वडील सुभाष देऊ तांबे (५९, रा. अंजनी, बौद्धवाडी क्र. २, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.