

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील मिऱ्या-नागपूर महामार्गांवरील आंबा घाटातील दख्खन बस थांब्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर झालेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली असल्याचे निदर्शनास आले.
रामा बाळू माशाळ (वय ३०, रा. खिलारहट्टी, ता. बबलेश्वर. जि. विजापूर) हा सापुचेतळे ते विजापूर असा जात असताना आंबा घाटात आला असता, अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात होऊन जागीच ठार झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. अपघाताचे वृत्त समजताच साखरपा पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहायक पोलिस फौजदार शांताराम पंदेरे, हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी दुचाकीस्वाराला साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले; मात्र तत्पूर्वी तो मृत झाला होता.
यावेळी देवरुखचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शक सूचना केल्या असून अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. बाळू तांबे यांच्या आईचे निधन झाल्याचे समजताच त्यांच्या नातेवाईकांनी विजापूरला मोठी गाडी घेऊन जाण्याचे ठरवले. मात्र, त्यातील नातेवाईक रामा माशाळ हा त्यांचे न ऐकता दुचाकीने रात्री दीड वाजता सापुचेतळे येथून विजापूरला जात असताना आंबा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात होऊन रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.