

रत्नागिरी : नागपूर-मिर्या महामार्गावर शहरानजीकच्या खेडशी परिसरात सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. सकाळी घडलेला रिक्षा अपघात पाहण्यासाठी काही क्षण दुचाकी थांबवलेल्या एका दाम्पत्यावर काही क्षणातच काळाने झडप घातली. हातखंबा येथून रत्नागिरीच्या दिशेने मोठ्या काळ्या दगडांची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने प्रांजल प्रज्वल पांचाळ (वय २७, रा. खालगाव, जाकादेवी) या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती प्रज्वल प्रमोद पांचाळ (वय २८) गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डंपर (एमएच-०८ बीके-४०९९) हातखंबाहून रत्नागिरीकडे मोठ्या काळ्या दगडांची वाहतूक करत होता. सकाळी सुमारे पावणेबारा वाजण्याच्या सुमारास खेडशी येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. डंपर प्रथम रस्त्यालगतच्या कठड्याला धडकला आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभी असलेली दुचाकी (एमएच-०८ एडब्ल्यू-०५६६) चिरडत थेट रस्त्याखाली पलटी झाला.
याचठिकाणी काही वेळापूर्वी रिक्षाचालक प्रीतम दीपक सावंत (रा. लाजूळ) यांच्या रिक्षाचा अपघात झाला होता. तो अपघात पाहण्यासाठी अनेक नागरिक घटनास्थळी थांबले होते. प्रज्वल आणि प्रांजल पांचाळ हेही रिक्षा अपघात पाहण्यासाठी काही क्षण थांबले होते. मात्र, त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.
अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, प्रांजल पांचाळ या डंपरखाली अडकून पडल्या. क्रेनच्या साहाय्याने डंपर बाजूला केल्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. जखमी प्रज्वल पांचाळ यांच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधित डंपर के. एस. पवार यांच्या मालकीचा असून, तो राजेश गणपत विश्वकर्मा (वय ३१, रा. एमआयडीसी, रत्नागिरी) चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.