

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरात मंगळवारी पहाटे एका तरुणाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तेथील एका टपरीच्या मागे या तरुणाचा मृतदेह आढळून आला. डोक्यात जांभा दगड घालून त्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
नवनाथ बबन कांबळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, तो मूळचा वांगी (ता. कडेगाव, जिल्हा सांगली) येथील रहिवासी आहे. लोटे येथील एका खासगी कंपनीत तो नोकरीला होता आणि वालोपे येथे कोकण रेल्वे आरपीएफ कर्मचारी असलेल्या आपल्या नातेवाईकाकडे वास्तव्यास होता. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तो कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, मंगळवारी पहाटे वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरातील एका टपरीच्या मागे त्याची हत्या झाल्याचे समोर आले.
या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश सणस, पोलिस निरीक्षक प्रशांत आवारे, पोलिस उपनिरीक्षक विकास निकम, सावंत, ए. एस. आय. अमोल यादव व पोलिस कर्मचारी घटनास्थळी होते.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत. कामथेे उपजिल्हा रुग्णालय येथे शिवविच्छेदन करण्यात आले.