

रत्नागिरी : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना संचित रजेवर (पॅरोल) बाहेर येऊन तब्बल नऊ महिन्यांपासून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. चन्नाप्पा सन्नाप्पा गंगवार (वय 33) असे या आरोपीचे नाव असून, त्याला नवी मुंबईतून अटक करण्यात आली.
मूळचा कर्नाटक राज्यातील विजापूर येथील असलेला चन्नाप्पा हा गोवा राज्यातील मडगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खून, अपहरण आणि पुरावा नष्ट करणे (भा.दं.वि. कलम 302, 364, 201) या गुन्ह्यांमध्ये गोवा येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सुमारे नऊ महिन्यांपूर्वी त्याला 30 दिवसांची पॅरोल रजा मंजूर झाली होती. या काळात त्याने रत्नागिरीत वास्तव्य करणे आणि रजा संपताच पुन्हा कारागृहात हजर होणे बंधनकारक होते.
मात्र, चन्नाप्पा याने रजेचा कालावधी संपल्यानंतर कारागृहात न परतता पलायन केले. त्यामुळे त्याच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या नऊ महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर, तो नवी मुंबईत वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून गुरुवारी त्याला नवी मुंबईतून ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.