Ratnagiri Crime : प्रेमाच्या आमिषाने १७ वर्षीय मुलीचे अपहरण; चिपळूणमध्ये डांबून अत्याचार

उदगीर पोलिसांची २४ तासांत धडक कारवाई; मुख्य आरोपीसह दोघांना अटक, स्थानिकाच्या भूमिकेचा तपास
Rape Case
प्रेमाच्या आमिषाने १७ वर्षीय मुलीचे अपहरण(File Photo)
Published on
Updated on

रत्नागिरी : लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला कोकणात डांबून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेमाचे आमिष दाखवून मुलीला पळवून नेणाऱ्या नराधमांनी तिला रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एका ग्रामीण भागात डांबून ठेवले होते आणि तिच्यावर अत्याचार केले होते. मात्र, उदगीर ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या २४ तासांत या संपूर्ण गुन्ह्याचा छडा लावला आहे. पीडित मुलीची सुटका करत पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या सह-आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

या धडक कारवाईची माहिती उदगीर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक गाडे यांनी दिली.​ या संतापजनक घटनेची सुरुवात उदगीर तालुक्यातील लोणी गावातून झाली. येथील एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबाने सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने हतबल झालेल्या नातेवाईकांनी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली. मुलीचे वय लक्षात घेता पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

पोलिस निरीक्षक गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाला सुरुवात केली. मुलगी बेपत्ता झाल्यापासून वेळ न घालवता पोलिसांनी संशयितांच्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले.​‘मोबाईल लोकेशन’चा अचूक माग काढत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. पीडित मुलगी लातूरपासून शेकडो किलोमीटर दूर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असल्याचे निष्पन्न झाले. मुख्य आरोपीला मदत करणाऱ्या गणेश बसुराज फड या सह-आरोपीचा एक मित्र चिपळूणच्या ग्रामीण भागात राहतो. याच मित्राच्या घरात पीडित मुलीला डांबून ठेवण्यात आले होते.

उदगीर पोलिसांनी तातडीने स्थानिक यंत्रणेच्या मदतीने तिथे छापा टाकला. अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी त्या घरातून मुलीची सुटका केली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.​ पोलिस संरक्षणात आल्यानंतर पीडित मुलीने रत्नागिरीत तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आपबिती सांगितली. या भयानक प्रकारानंतर या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो - POCSO) अंतर्गत अत्यंत कडक कलमे वाढवण्यात आली आहेत. गुन्हा नोंद क्रमांक ४८७/२०२६ अन्वये पोलिसांनी कृष्णा अच्युत फड (१८, मुख्य आरोपी - अत्याचार केल्याचा आरोप) आणि गणेश बसुराज फड (२०, सह-आरोपी) यांना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली असून, पोलिस आता चिपळूणमधील त्या स्थानिक मित्राच्या भूमिकेसह या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news