Ratnagiri News : कारवाई किरकोळ; गुटख्याचा काळाबाजार मात्र तेजीत!

दापोलीत गुटखा विक्रीचे दर वधारले; बंदीचा फायदा घेत चढ्या दराने विक्री
Gutkha ban violation
गुटखा विक्रीFile Photo
Published on
Updated on

दापोली : दापोली शहरात अन्न व औषध प्रशासनाने नुकतीच काही पानटपऱ्यांवर कारवाई करून दंडात्मक कार्यवाही केली असली, तरी या कारवाईचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र आहे. उलट कारवाईनंतर गुटखा, मावा आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ झाली असून त्यांच्या दरातही वाढ झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातलेली असतानाही दापोलीतील अनेक भागांत हे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी पूर्वीपेक्षा अधिक दराने गुटखा विकला जात असून, अधूनमधून होणाऱ्या कारवायांचा फायदा घेत विक्रेते ग्राहकांकडून जादा पैसे आकारत असल्याचे बोलले जात आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात अन्न सुरक्षा आणि बंदी असलेल्या पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेतली असली, तरी स्थानिक स्तरावरील कारवाईत अपेक्षित सातत्य आणि पारदर्शकता दिसून येत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

शहरातील बेकरी, हॉटेल, मेडिकल स्टोअर्स, चायनीज सेंटर तसेच खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची नियमित आणि निष्पक्ष तपासणी होत नसल्याची तक्रार आहे. कारवाईची माहिती आधीच पसरत असल्याने संबंधित व्यावसायिक सावध होतात आणि त्यामुळे धाडींचा अपेक्षित परिणाम होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दापोलीत गुटखा विक्रीची ठिकाणे सर्वश्रुत असतानाही सातत्यपूर्ण धाडी टाकल्या जात नसल्याने विक्रेते निर्धास्त असल्याचे बोलले जात आहे. वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर ही बाब गंभीर मानली जात असून गुटखा विक्री व पुरवठा साखळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

नागरिकांच्या मते, केवळ किरकोळ कारवाया करून प्रश्न सुटणार नसून गुटखा विक्रीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी व्यापक आणि सातत्यपूर्ण मोहीम राबविण्याची गरज आहे. अन्यथा बंदी असूनही गुटख्याचा काळाबाजार अधिक फोफावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

"आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा विक्रीविरोधात उचललेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र जिल्हास्तरीय अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्या आदेशांची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तसे होत नसल्याने दापोलीत अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत."
- अनिल जाधव, सरचिटणीस, उबाठा पक्ष, दापोली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news