

रत्नागिरी : शहरालगतच्या फणसवळे परिसरात चार ते पाच गोवंशीय प्राण्यांचे अवयव बेवारस अवस्थेत आढळून आल्याने रविवारी एकच खळबळ उडाली. हे अवयव प्लास्टिकमध्ये गुंडाळून टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले असून, प्राथमिक पाहणीत संबंधित प्राण्यांचे कातडे काढण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
फणसवळे परिसरात काही नागरिकांना संशयास्पद वस्तू पडलेली दिसल्यानंतर त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता गुरांचे अवयव असल्याचे आढळून आले. अवयवांची अवस्था पाहता संबंधित गुरांचे कातडे काढून त्यांचे अवशेष येथे आणून टाकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. सर्व अवयव ताब्यात घेत पंचनामा केला असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला असून संबंधिताचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत.
याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांनी सांगितले की, घटनास्थळी सापडलेल्या गुरांचे कातडे काढलेले असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला, याचा शोध पोलीस घेत आहेत. यापूर्वी मिरजोळे एमआयडीसी परिसरातही अशाच प्रकारची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पुन्हा गोवंशीय प्राण्यांचे अवयव सापडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी व संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.