

राजापूर : रायपाटण गावात घडलेल्या 74 वर्षीय वैशाली शांताराम शेटे यांच्या मृत्यू प्रकरणी राजापूर पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांकडून या प्रकरणी जोरदार तपास सुरू होता, विविध बाबींची सखोल चौकशी केली जात आहे.
बुधवारी रायपाटण येथे वैशाली शेटे यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांनी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली.
दरम्यान, फॉरेन्सिक लॅबची टीमही गुरुवारी रायपाटण येथे दाखल झाली होती. तपासात असे समोर आले की, मयत शेटे यांच्या डोक्यावर जखम होती, तर शरीर काळे पडले होते. त्यांच्या कानात सोन्याच्या रिंगा होत्या, मात्र गळ्यातील सोन्याची चेन गायब आढळली. या सर्व परिस्थितीचा विचार करून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा रायपाटण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत.