

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे पोलिसांनी कारवाई करत कत्तलीसाठी कत्तलखान्याकडे नेत? ? असलेल्या गोवंश पकडला आहे. बोलेरो गाडीतून अत्यंत निर्दयतेने कोंबून बैलांची वाहतूक करणार्या तिघांविरोधात अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई 22 नोव्हेंबर रोजी शिरगाव येथील शिवाजी चौक परिसरात करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तीन बैल, बोलेरो गाडी असा एकूण 5 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडकडून चिपळूण, शिरगाव आणि कुंभार्ली घाट मार्गे सांगली जिल्ह्यातील मायणी येथे कत्तलीसाठी जनावरे नेली जात असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पांढर्या रंगाच्या बोलेरो पीकअप (एमएच-11-डीव्ही-0481) गाडीची तपासणी केली असता त्यात तीन बैल आढळून आले. ही जनावरे गाडीच्या हौद्यातील छोट्याशा जागेत अत्यंत दाटीवाटीने, निर्दयतेने आखूड दोरीने मानेला बांधून ठेवण्यात आली होती. याप्रकरणी संकेत रघुनाथ जाधव (27, रा. कुंभार्ली घागवडी, ता. चिपळूण) यांनी तक्रार दाखल केली आहे.
या बेकायदेशीर वाहतूक प्रकरणी पोलिसांनी सचिन रंगराव चव्हाण (30, रा. लोटे, आवाशी ता. खेड), सचिन मुरलीधर चव्हाण (25, रा. खवटी, ता. खेड) आणि रुद्र राजेंद्र दळवी (17, रा. गुणदे, देऊळवाडी, ता. खेड) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. संशयितांनी एकमेकांच्या संगनमताने विनापरवाना ही वाहतूक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 30 हजार रुपये किमतीचा 10 वर्षे वयाचा तांबड्या रंगाचा बैल, 30 हजार रुपये किमतीचा 12 वर्षे वयाचा तांबड्या रंगाचा बैल आणि 40 हजार रुपये किमतीचा
12 वर्षे वयाचा पांढर्या रंगाचा बैल असे एकूण 1 लाख रुपये किमतीचे गोधन ताब्यात घेतले आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली 4 लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप गाडी आणि 5 हजार रुपये किमतीचा बैलगाडी शर्यतीसाठी वापरला जाणारा एक लाल रंगाचा छकडा असा एकूण 5 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांविरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 9, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.