

चिपळूण : तालुक्यातील डेरवण येथील ६ महिने गरोदर विवाहितेचा एक लाख रुपयाच्या मागणीसाठी छळ करुन तिला जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूला 10 वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी आरोपी पती दिनेश महादेव कदम (३४ वर्षे) व सासू मिनाक्षी महादेव कदम ( ५७ वर्षे) या दोघाना १० वर्षे सक्तमजूरी व प्रत्येकी ३५ हजार रू दंड व दंड न भरल्यास प्रत्येकी ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
हा गुन्हा सावर्डे पोलिस ठाण्याचे हद्दीत घडला असून त्यातील मयत काव्या दिनेश कदम ( २५) वर्षे हिने घराशेजारील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. तिचा विवाह दिनांक १५ मे २०१५ रोजी आरोपी दिनेश याचेसोबत झाला होता. विवाहनंतर सुमारे ४ महिन्यातच तिचा पती व सासू यांनी गाडीसाठी एक लाख रू. माहेरहून आणण्याबाबत तगादा लावला. त्या कारणावरुन मयत हिला धर्मपत्नीचा दर्जा न देता पतीने मारझोड केली व घराबाहेर काढले व घराच्या शेडमध्ये राहण्यास सांगितले. दोन्ही आरोपी मयत काव्या हिला विहिरीला पंप असताना सुध्दा हाताने पाणी काढायला लावत. तिला अपमानित करुन एकटीला सतत माहेरी पाठवत. गर्भवती असतानां देखील आरोपींनी वारंवार पैशाचा तगादा लावून तिचे जगणे असहय करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने तिने सासरचे घरासमोरीलच विहीरीत गर्भवती असतांना २१ नोव्हेंबर २०१६ रोजी उडी मारुन आत्महत्या केली .म्हणून आरोपी पती व सासूविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.