

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध आरेवारे समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या एका तरुण जोडप्याला झिपलाईनच्या साहसी खेळादरम्यान थरारक अनुभवाला सामोरे जावे लागले. झिपलाईनवरून समुद्राच्या दिशेने प्रवास करत असताना अचानक दोघेही समुद्राच्या मध्यभागी हवेतच अडकून पडले. खाली अथांग समुद्र आणि वर हवेत लटकलेल्या अवस्थेमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अखेर स्थानिक नागरिक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत दुसऱ्या रस्सीच्या सहाय्याने दोघांनाही सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
आरेवारे समुद्रकिनाऱ्यालगतच्या उंच कड्यावरून थेट समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने झिपलाईनची साहसी सुविधा सुरू करण्यात आली आहे. समुद्राच्या वरून हवेत झेपावत झिपलाईनचा रोमांचक अनुभव घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास याच साहसी खेळादरम्यान अनपेक्षित प्रकार घडला. झिपलाईनच्या माध्यमातून प्रवास सुरू केलेले एक तरुण जोडपे समुद्राच्या वर मध्यभागी पोहोचताच अचानक पुढे जाणे थांबले. त्यामुळे दोघेही हवेतच लटकलेल्या अवस्थेत अडकून पडले. झिपलाईनमध्ये नेमका कोणत्या कारणामुळे अडथळा निर्माण झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली की अन्य काही कारण होते, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
समुद्राच्या वर हवेत अडकलेल्या जोडप्याची अवस्था पाहून किनाऱ्यावर उपस्थित पर्यटकांमध्येही घबराट पसरली. काही काळ नेमके काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संबंधित कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिक मदतीसाठी पुढे सरसावले. दुसऱ्या मजबूत रस्सीची व्यवस्था करून तिच्या सहाय्याने अडकलेल्या जोडप्याला हळूहळू किनाऱ्याच्या दिशेने खेचण्यात आले. शर्थीच्या प्रयत्नांनंतर दोघांनाही सुखरूप खाली आणण्यात यश आले. या घटनेमुळे आरेवारे समुद्रकिनाऱ्यावरील साहसी पर्यटन सुविधांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पर्यटकांच्या जीवाशी निगडित असलेल्या अशा साहसी खेळांमध्ये झिपलाईनची तांत्रिक तपासणी, सुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन बचाव व्यवस्थेची नियमित खातरजमा होणे आवश्यक आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.