

प्रवीण शिंदे
दापोली : एका बाजूला निळाशार समुद्र, दुसऱ्या बाजूला निसर्गरम्य डोंगररांगा आणि वातावरणात पसरलेली गुलाबी थंडी... अशा आल्हाददायक वातावरणाने सध्या दापोलीच्या पर्यटनाला चांगलेच बहर आणला आहे. समुद्राच्या लाटांचा नाद आणि अंगाला सुखावणारी थंडी यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटकांची पावले दापोलीच्या दिशेने वळू लागली आहेत. त्यामुळे तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसत आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात दापोलीतील थंडीचा जोर वाढू लागला आहे. रविवारी २२ नोव्हेंबर रोजी तालुक्याचे किमान तापमान १०.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने थंडीची तीव्रता चांगलीच जाणवू लागली आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी हवेत गारवा वाढत असून, दिवसभरातील आल्हाददायक वातावरण पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे.
दापोली तालुक्याला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा, स्वच्छ वाळू, नारळी-पोफळीच्या बागा आणि निसर्गरम्य परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. हर्णै, मुरुड, कर्दे, लाडघर, कोळथरे यांसारख्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारणे, लाटांचा आनंद घेणे, सूर्योदय आणि सूर्यास्ताचे नयनरम्य दृश्य अनुभवणे यासाठी पर्यटक विशेष पसंती देत आहेत. हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग, खानावळी आणि स्थानिक पर्यटनपूरक व्यवसायांनाही या वाढत्या पर्यटक संख्येचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.