

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : सावकारी परवाना मिळवून देण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (दि.११) दुपारी १२ च्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. विनायक रामचंद्र भोवड, (वय ५७, रा. 'स्वामी' त्रिविक्रमनगर, कसोप सडा, ता. जि. रत्नागिरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
२६ जून २०२४ रोजी ५० हजारांची लाच मागितली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावकारी परवाना मिळवून देण्यासाठी विनायक भोवड यांनी २६ जून २०२४ रोजी तक्रारदार यांच्याकडे ५० हजारांची लाच मागितली होती. त्यानंतर ही लाचेची रक्कम निबंधक कार्यालयात स्वीकारताना त्याला पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अनंत कांबळे, सहायक फौजदार संदीप ओगले, संतोष कोळेकर, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, हेमंत पवार, राजेश गावकर यांनी केली.