

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरण परिसरातील वीज पुरवठा सोमवारी संपूर्ण दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराचा पाणी पुरवठाही या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे. या दिवशी रत्नागिरी नगर परिषदेकडून तीन ठिकाणच्या जलवाहिन्या स्थलांतरीत करण्याचे काम करून घेतले जाणार आहे. शीळ धरणावरील डिझेलवर चालणारे पंप चालू ठेवले तर सुमारे 100 लिटर डिझेलचा खर्च वाचवला जाणार आहे.
शीळ गावात गेल्या सोमवारी दिवसभर वीज पुरवठा नव्हता. त्यामुळे गेल्या सोमवारीही रत्नागिरी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. धरणावर पाणी खेचण्यासाठी डिझेलवर चालणारे पंप आहेत. परंतु, वीज पुरवठा नसेल तेव्हा हे पंप चालवायचे झाले तर सुमारे 100 लिटर डिझेलचा खर्च करावा लागतो. रत्नागिरी नगर परिषदेची आर्थिक स्थिती दोलायमान असल्याने एका दिवसाचा डिझेलसाठी हजारो रुपये खर्च होण्यापेक्षा या दिवशी पाणी पुरवठाच बंद ठेवून खर्चही वाचतो आणि देखभाल दुरुस्तीचीही कामे केली जात आहेत.
सोमवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने या दिवशी सहकार नगर, साळवी स्टॉप आणि छत्रपती नगरातील तीन जलवाहिन्या स्थलांतरीत करण्याचे काम केले जाणार आहे. गेल्या सोमवारी धरणावरील पंपांच्या जाळ्यांची स्वच्छता करण्यात आली होती. सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू असून अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाळाही लांबणीवर आणि कमी असल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या देखभाल दुरुस्तीच्या निमित्ताने सोमवारचा पाणी पुरवठा बंद ठेवून एकप्रकारे पाण्याची बचतच होत आहे.