

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. आता ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सकाळी 10 ते दुपारी चार वाजेपर्यंत कडक ऊन्ह पडत आहे. कडक उन्हामुळे नागरिक डोक्यावर टोपी, तोंडाला मास्क, डोळ्यावर गॉगल घालून घराबाहेर पडत आहेत. दिवसा कडक ऊन, रात्री उकाडा, पहाटे थंडी लागत आहे. एकंदरीत ऑक्टोबर हिटच्या चटक्याने नागरिक घामामुळे अक्षरशा वैतागले आहेत. ऑक्टोबर हिट सुरू झाली असून काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने चार महिने दमदार बॅटींग केल्यानंतर आता पाऊस पूर्ण थांबलेला आहे. त्यामुळे आता ऑक्टोबर हिट जाणवू लागले आहे. अंगाला उन्हाचे चटके बसत असून मोठ्या प्रमाणात घाम येत असल्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी ते दुपारी मोठ्या प्रमाणात नोकरदार, व्यापार्यांची वर्दळ दिसून येते. दुपारनंतर रस्ते सामसूम होत आहे.संध्याकाळी उन्हे कमी झाल्यावर नागरिक घराबाहेर पडत आहेत. दिवसभर विजेचा लंपडाव सुरू असून कधी लाईट जाते तर कधी दिवसभर लाईट असते. विविध तालुक्यात वीज वारंवार जात असल्यामुळे घामाने नागरिक हैराण झाले आहेत.
रत्नागिरी शहरात आता पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्यामुळे अर्धवट असलेल्या रस्त्यांवर असलेली धूळ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. धुळीचे साम्राज्य दिसून येत असून दुचाकी, तीन चाकींना धुळीचा सामना करावा लागत आहे. तोंडाला मास्क, रूमाल बांधून बाहेर पडावे लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. तसेच पावसामुळे जिल्ह्यातील निकृष्ट डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची वाट लागली आहे. गावोगावी, शहरातील रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. आता त्या रस्त्यातून मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. रत्नागिरी तालुक्यातील जे.के फाईल्स, साळवी स्टॉप, कुवारबाव, रेल्वे स्टेशन, महालक्ष्मी मंदिर परिसर यासह शहरातील विविध ठिकाणी धुळीचे साम्राज्य होत असून नागरिक धुळीने हैराण होत आहेत.