Ratnagiri News : रत्‍नागिरीत राष्ट्ररक्षण मूक पदयात्रेद्वारे नागरिकांचे देशविरोधकांना प्रत्‍युत्तर

संविधान सन्मान मंचतर्फे आयोजन; हजारोंनी दाखवली एकजूट
Ratnagiri News
रत्‍नागिरीत राष्ट्ररक्षण मूक पदयात्रेद्वारे नागरिकांचे देशविरोधकांना प्रत्‍युत्तर
Published on
Updated on

रत्नागिरी : जंतर-मंतरवर कॉक्रोज जनता पार्टीने नीट पेपर फुटीचे कारण पुढे करून अराजक माजवणारे आंदोलन केले. त्यामध्ये हिंदू देव-देवतांबद्दल अपशब्द वापरले, एवढेच नव्हे तर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल चुकीचे वक्तव्य आणि देशाचे तुकडे करू, अशा घोषणा दिल्या. हे आंदोलन राष्ट्रविरोधी झाले. या सर्वांचा निषेध नोंदवण्यासाठी संविधान सन्मान मंचातर्फे गुरुवारी रत्‍नागिरीत हजारोंच्या संख्येने राष्ट्ररक्षण मूक पदयात्रा काढून प्रत्युत्तर देण्यात आले. राष्ट्रहित व संविधानाचा सन्मान करणाऱ्या या जेन झी पिढीतील तरुणांनी एकीचे दर्शन घडवले. मारुती मंदिरपासून सुरू झालेल्या मूक मोर्चाची सांगता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी सभेने झाली.

मूक पदयात्रेची सुरुवात मारुती मंदिर येथे झाली. सकाळी १०.३० वाजल्यापासून हे युवक, युवती, जागरुक नागरिक, रत्नागिरीकर मोठ्या संख्येने येऊ लागले होते. प्रत्येकाच्या हाती फलक झळकत होते. यावेळी अजिंक्य केसरकर याने सांगितले की, नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता निर्माण करणे व देशाच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचविणाऱ्या कृतींच्या निषेधार्थ ही मूक पदयात्रा काढण्यात आली.

पदयात्रेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. तसेच, जिल्हा रुग्णालयाजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विद्यार्थी प्रतिनिधी आणि नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर जाहीर सभा झाली. यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करून जंतर-मंतरवरील आंदोलन कसे भरकटले आणि राष्ट्रविरोधी शक्तींनी त्यात कशी घुसखोरी केली याचे दाखले दिले. परंतु, आमची जेन झी पिढी राष्ट्राचे रक्षण करणारी आहे, आम्हाला याची जाणीव आहे, असे सांगितले.

पदयात्रेद्वारे राष्ट्रहित, संविधानाचा सन्मान आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. या पदयात्रेमध्ये माजी आमदार बाळ माने, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, नगरसेविका, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे, रत्‍नागिरी भाजपा शहराध्‍यक्ष दादा ढेकणे, चिपळूण शहराध्‍यक्ष शशिकांत मोदी, रत्‍नागिरी तालुकाध्‍यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे, शिवसेनेचे बाबू पाटील, नगरसेवक निमेश नायर यांच्‍यासह रत्‍नागिरी व चिपळूण, देवरुख येथील नगरसेवकांसह विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मूक पदयात्रेत आजचा संकल्प उद्याचा सुरक्षित भारत, राष्ट्रहित सर्वोपरी, भारत एक आहे, श्रेष्ठ आहे, आज आमचे मौन बोलेल, राष्ट्रप्रेम जग जिंकेल आदी फलक झळकत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news