

चिपळूण : तिवरे धरण दुर्घटनेनंतर विस्थापित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आला असून अलोरे येथे उभारण्यात आलेल्या पुनर्वसन वसाहतीतील ३३ घरांचे १२ सप्टेंबर रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. अलोरे येथे उभारण्यात आलेली ही वसाहत धरणग्रस्त कुटुंबांना सुरक्षित निवारा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. दुर्घटनेनंतर पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षे चर्चेत होता. मात्र आता घरांचे काम पूर्ण झाल्याने प्रत्यक्ष पुनर्वसनाचा मार्ग सुकर झाला आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी केले.
पालकमंत्री सामंत यांनी रविवारी सकाळी अचानक अलोरे येथे भेट देत या पुनर्वसन वसाहतीची पाहणी केली. घरांची पाहणी केल्यानंतर त्यांनी पुनर्वसन प्रक्रिया आणि घरांच्या वाटपाबाबत महत्त्वाची माहिती दिली. तसेच घरांची गुणवत्ता, उपलब्ध सुविधा तसेच पुनर्वसनाच्या प्रक्रियेची माहिती घेतली.
यावेळी ना. सामंत म्हणाले, तिवरे धरण फुटल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत अनेक कुटुंबांवर संकट कोसळले होते. या धरणग्रस्त ग्रामस्थांचे सुरक्षित आणि योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून अलोरे येथे पक्की आणि सर्वसोयींनी युक्त घरे उभारण्यात आली. या पुनर्वसन वसाहतीसाठी सिद्धिविनायक ट्रस्ट आणि सिडकोच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता ही घरे धरणग्रस्त कुटुंबांच्या ताब्यात देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १९ घरांच्या वाटपाबाबत ग्रामस्थांनी आपापसात एकमताने निर्णय घ्यावा. ग्रामस्थांमध्ये एकमत झाले नाही तर प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून अधिकृत सोडत काढून नियमानुसार घरांचे वाटप करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्यावर्षी गणेशोत्सवादरम्यान वाहून गेलेल्या पुलाच्या कामाचाही पालकमंत्री सामंत यांनी उल्लेख केला. या पुलासाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून काम सुरू करण्यात आले असून, सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे परिसरातील वाहतूक व दळणवळण प्रश्नही लवकरच सुटण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांचे अलोरे विश्वकर्मा चौक येथे जिल्हा परिषद सदस्या विनया झगडे व पंचायत समिती सदस्य विनोद झगडे यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, कपिल शिर्के आदी उपस्थित होते. अलोरे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रमोद महाजन व मनीष गांगण यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली.
तिवरे धरण दुर्घटनेच्या जखमा आजही अनेकांच्या मनात ताज्या असताना, धरणग्रस्तांसाठी अलोरे येथे उभारण्यात आलेली घरे त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने मोठा दिलासा मानला जात आहे. १२ सप्टेंबरला होणाऱ्या लोकार्पणानंतर प्रत्यक्ष घरवाटपाची प्रक्रिया पूर्ण होऊन धरणग्रस्त कुटुंबांना सुरक्षित निवारा मिळणार असल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष आता या कार्यक्रमाकडे लागले आहे.
विद्यानंद बापट यांच्या भूमिकेवर भाष्य
गणेशोत्सव आणि डीजेच्या मुद्द्यावरही पालकमंत्री सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली. रत्नागिरीचे सुपुत्र विद्यानंद बापट यांच्या मराठी भाषेबद्दलच्या भूमिकेचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, मराठी भाषेसाठीची त्यांची भूमिका मंत्रालयातही आवश्यक आहे. मात्र गणेशोत्सव बंद करण्याची मागणी चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि भावविश्वाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत, शासनाने विविध घटकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला असल्याचे सामंत यांनी नमूद केले. सगळ्याच मागण्या मान्य होणार नाहीत, असे स्पष्ट करत त्यांनी डीजेच्या विषयावर शासनाची भूमिका स्पष्ट केली.
गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका व्यक्त करताना चार बेस, चार टॉप व पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सव साजरा करण्याचा पर्याय पुढे असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषा मंत्री म्हणून विद्यानंद बापट यांची भेट घेऊन मराठी भाषेच्या विषयावर चर्चा करणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.
ऑपरेशन टायगर सांगून होत नाही; ते अचानक होते!
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना उदय सामंत यांनी, ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख करताना, अशा राजकीय घडामोडी आधी जाहीर करून होत नसतात, तर त्या अचानक घडतात, असे सूचक वक्तव्य केले. गुवाहाटी, सहा खासदार आणि तीन आमदारांचे जे झाले, त्याचप्रमाणे पुढचेही अचानक होईल, असे सांगत त्यांनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणारे विधान केले.