

चिपळूण शहर : सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणाचा आधार असलेल्या ११ जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. यात प्रामुख्याने गळक्या छप्पर दुरुस्तीचाही समावेश आहे. लवकरच ही कामे पूर्णत्वास नेली जाणार आहेत. त्यामुळे नव्या शैक्षणिक सत्रात गळक्या शाळांचा प्रश्न उद्भवणार नसून उर्वरित शाळांच्या दुरुस्ती कामाला आचारसंहिता संपल्यानंतर मंजुरी मिळणार आहे.
एकेकाळी विद्यार्थी संख्येमुळे प्रकाशझोतात आलेल्या जि. प. शाळा अलीकडे विद्यार्थी पटसंख्येअभावी ओस पडू लागल्या. आजही ही स्थिती कायम असून पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या शासनस्तरावरुन गुणवंतावाढीसाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. १५ जूनपासून नव्या शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार असून पुन्हा जिल्हा परिषद शाळा गजबजणार आहेत. अशा स्थितीत तालुक्यातील २० शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून वरिष्ठस्तरावर पाठवण्यात आले होते. अखेर यातील ११ शाळा दुरुस्तीचे प्रस्तावास मंजुरी मिळाली असून या शाळांच्या दुरुस्तीचे काम काही दिवसांपूर्वीच सुरु झाले आहे.
यामध्ये जि.प. शाळा असुर्डे-निर्मळवाडी, जि.प.शाळा रेहेळ नं १, जि.प. शाळा बोरगाव क्र. १, जि.प. शाळा उभळे-आगारगाव क्र.१, जि.प. शाळा कोळकेवाडी-पठारवाडी, जि.प. उर्दु शाळा वाघीवरे, जि.प. शाळा नांदीवसे-लागडेवाडी, जि. प. शाळा नांदीवसे-गणेशपूर, जि. प. शाळा कालुस्ते-मराठवाडी, जि. प. शाळा रामपूर क्र.२, जि.प.शाळा आंबेरे आदी शाळांच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्यात आहेत.
दरम्यान, २० शाळांपैकी ११ शाळांच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार असले तरी उर्वरित शाळांच्या दुरुस्तीच्या प्रस्तावास सध्याची आचारसंहिता संपल्यानंतर मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे या उर्वरित शाळांची छप्पर दुरुस्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांना गळक्या शाळामध्ये शिक्षणासाठीचे धडे गिरवावे लागणार आहेत.