Ratnagiri News : नगराध्यक्ष सकपाळ यांची ‘ॲक्शनवर रिॲक्शन’

गोवळकोट रोड परिसरातील अनधिकृत बांधकाम तोडले; उपनगर परिसरात पाण्याची चवदेखील चाखली
Ratnagiri News
चिपळूण : गोवळकोट रोड येथील अनधिकृत टपऱ्या अशा जेसीबीच्या साहाय्याने उद्‌ध्वस्त करण्यात आल्या.
Published on: 
Updated on: 

चिपळूण शहर : गेले दोन-तीन दिवस चिपळूण शहर विविध विषयांवरून चर्चेत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गोवळकोट, पेठमाप, उक्ताड आदी उपनगर परिसरातील मचूळ पाणीप्रश्नावर बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गोवळकोट एन्रॉन ब्रिजखालील मैदानावर कौटुंबिक वादावरून कोयत्याने जिवघेणा हल्ला करण्यात आला. अशा दोन्ही घटनांची शहरात चर्चा सुरू असताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी मात्र या दोन्ही घटनांच्या ॲक्शनवर तातडीने रिॅॲक्शन घेतली.

गोवळकोट येथे झालेल्या हल्ल्यातील संशयितांच्या गोवळकोट रोड येथे असलेल्या बेकायदेशिर व्यवसायावर रातोरात जेसीबी फिरवून अनधिकृत टपऱ्या उद्‌ध्वस्त केल्या तर पाणी प्रश्नावरून सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेत नगराध्यक्ष सकपाळ यांनी उपनगर गोवळकोटसह पेठमाप या ठिकाणी नागरी वस्तीतील अनेक घरात जाऊन त्या ठिकाणी न.प.च्या माध्यमातून पुरवठा होत असलेल्या पाण्याची चव चाखून पाणीपुरवठा विभागाला आवश्यक त्या सूचना केल्या. एकूणच दोन दिवसांच्या घडामोडींच्या ॲक्शनवर सकपाळ यांनी रिॲक्शन दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

शहरात चार उपनगरातील नागरिकांचे मचूळ पाणीपुरवठा विषयावरून गेले तीन दिवस स्थलांतरित न.प.च्या सांस्कृतीक केंद्र मैदानावर साखळी उपोषण सुरू आहे. या दरम्यान सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नगरसेवक तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी भेट देऊन संवाद साधला. त्याच दरम्यान नगराध्यक्ष सकपाळ यांनीदेखील उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. त्यावेळी उपोषणकर्ते व सकपाळ यांच्यात शाब्दीक चकमक उडून वादास राजकीय वळण मिळाले. त्याच दरम्यान शहरातील गोवळकोट एन्रॉन ब्रिजच्या खालील पटांगणावर खेर्डी व गोवळकोट येथील दोन कुटुंबात आपापसातील नातेसंबंध वादावरून जोरदार हाणामारी झाली. त्यामध्ये एका कुटुंबातील सदस्यांना दुसऱ्या कुटुंबातील सदस्यांनी कोयतीसारख्या धारदार शस्त्राने गंभीर जखमी केले. याचे पडसाद उमटू लागले व हल्लेखोरांच्या बाबतीत या भागात अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्यातून कौटुंबिक वाद काही महिने सुरू आहे. हल्लेखोरांची या परिसरात दशहत मोठी आहे. विनापरवाना टपरी उभारून दहशतीच्या माध्यमातून व्यवसाय सुरू आहे. अशा तक्रारी नगराध्यक्ष सकपाळ यांच्या कानावर येताच सायंकाळी थेट नगराध्यक्षांनी न.प.ला सूचना देत जेसीबीच्या माध्यमातून संशयितांची अनधिकृत व्यवसायाचे अतिक्रमण भुईसपाट केले.

परिणामी, त्यांच्या या निर्णयामुळे गोवळकोट रोड परिसरात खासकरून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पाणी विषयात नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष उपनगरातील अनेक घरात जाऊन न.प.ने पुरविलेल्या पाण्याची चव घेत रहिवाशांची मते जाणून घेत नगर परिषदला पाणीपुरवठ्याबाबत सूचना केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.