

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवडणूक प्रक्रिया नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. उपनगराध्यक्षपदी रूपाली दांडेकर यांचे नाव बिनविरोध घोषित करण्यात आले तर स्वीकृत सदस्य म्हणून ठाकरे सेनेकडून फैसल कास्कर, भाजपाकडून शितल रानडे, शिवसेनेकडून विकी लवेकर यांचीही निवड बिनविरोध झाली. या निवडीवर कोणताही आक्षेप नसल्याने नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी ही निवड जाहीर केली.
तब्बल चार वर्षांनंतर चिपळूण न.प.ची पहिली सर्वसाधारण सभा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात घेण्यात आली. यासाठी आसन व्यवस्था, ध्वनीक्षेपक व अन्य यंत्रणा तत्पर ठेवण्यात आली होती. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विशेष सभेसाठी आवश्यक असणारी कार्यवाही यशस्वी केली आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही प्रक्रिया पूर्ण झाली.
उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड झाल्यानंतर विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी सांस्कृतीक केंद्रात मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये भाजप नेते प्रशांत यादव, माजी आ. डॉ. विनय नातू, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, सौ. सीमा चव्हाण, सौ. सुवर्णा जाधव, समीर जाधव, माजी सभापती संतोष चव्हाण, माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले, विजय चितळे, आशिष खातू, उमेश खताते व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
निवड जाहीर होताच नवनियुक्त उपनगराध्यक्षा सौ. रूपाली दांडेकर, स्वीकृत नगरसेवकांचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, गटनेते शशिकांत मोदी, विकी नरळकर यांनी अभिनंदन केले. यानंतर जोरदार आतषबाजी करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी पहिल्याच सभेत मार्गदर्शन करताना, चिपळूण शहर स्मार्ट सिटी व्हावे हे माझे स्वप्न होते. मात्र, माझ्या एकट्याचे हे स्वप्न राहिलेले नाही तर ते आपल्या सर्व नगरसेवकांचे स्वप्न झाले आहे. त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी आपल्याला सहकार्य करा, म्हणजे आपण येत्या पाच वर्षांत चिपळूण शहर स्मार्ट बनवूया. या ठिकाणी कोणी सत्ताधारी नाही, कोणी विरोधक नाही. आपले काही समस्या, प्रश्न असतील थेट सांगा, त्या तातडीने सोडविल्या जातील. चिपळूण शहराच्या विकासासाठी जे करणे आवश्यक आहे ते आपण करू. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, असे आवाहन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केले.