

चिपळूण शहर : शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख व छत्रपती शिवाजी चौक ते पाग पॉवर हाऊस (स्वा. सावरकर चौक) रस्ता रूंदीकरणाच्या प्रक्रियेला चिपळूण न.प. प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार २ सप्टेंबरपासून प्रस्तावित रूंदीकरणामध्ये ताब्यात घेतल्या जाणार्या जागांचे मोजमाप व मूल्यमापन प्रशासनाकडून सुरू केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यासंदर्भात संबंधित जागा मालकांना यापूर्वीच नोटीसांद्वारे सूचीत करण्यात आले आहे.
शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांचे रूंदीकरण करण्याबाबत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी निर्णय घेतला. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने प्रामुख्याने शहरातील रस्ते रूंद असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी प्रथम प्रमुख वर्दळीचे रस्ते रूंद करण्यासाठी प्रशासनाकडून परिपूर्ण माहिती व तांत्रिक अहवाल नियोजन तयार करून घेतले. त्यानुसार आवश्यक असणार्या निधीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या महत्त्वाच्या विकासकामांचे प्रस्ताव निधीसाठी दिले. त्याला प्राथमिक स्तरावर संबंधितांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आता प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली जाणार आहे.
यापूर्वी प्राथमिक स्तरावर रस्ता रूंदीकरणाची मोजमापे घेण्यात आली. त्यानुसार दोनवेळा संबंधित जागा मालकांना या बाबत नोटीसा देऊन कल्पना देण्यात आली व बाधीत जागेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच संबंधितांनी रस्ता रूंदीकरणासंदर्भात प्रशासन व न.प.कडून कोणत्या अपेक्षा आहेत, अशा आशयाच्या सूचना मागविण्यात आल्या. आता प्रशासनाकडून रूंदीकरणासाठी कार्यवाहीचे पहिले पाऊल उचलले जाणार आहे. त्यानुसार प्रशासनाने छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख नाका दरम्यानच्या रस्ता रूंदीकरणाला दोन्ही बाजूने आवश्यक जागा रेखांकीत करण्यासाठी संबंधित जागांचे मोजमाप व रेखांकन करण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्याबाबत संबंधित जागा मालकांना प्रशासनाकडून नोटीसा देऊन सूचीत करण्यात आले आहे.