

चिपळूण : चिपळूण-कराड महामार्ग सोमवारी (दि.16) सकाळी 11 वाजल्यापासून ठप्प झाला आहे. कोयना-पाटण दरम्यान एका पुलाचे काम सुरू असल्याने नदीतून रस्ता काढण्यात आला होता. मात्र, हा रस्ता पाणी येऊन वाहून गेल्याने मार्ग बंद झाला आहे. परिणामी, चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक सकाळी 11 वा. पासून ठप्प झाली आहे. याचा मोठा परिणाम एस.टी.सह व्यापारावरही होणार आहे.
गेले अनेक दिवस गुहागर-विजापूर मार्गावरील पाटण ते कोयना या रस्त्याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या. या भागातील सुमारे 12 कि.मी.चा रस्ता खड्डेमय असून, या ठिकाणी सातत्याने अपघातदेखील होत आहेत. मात्र, सातारा राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. या रस्त्याचे काँक्रिटीकरण देखील सुरू आहे. पान 2 वर
कोयना ते पाटण दरम्यान एका पुलाचे काम सुरू असून पुलाच्या बाजूने उन्हाळी रस्ता करण्यात आला होता. मात्र, जोरदार पावसामुळे या नदीला पाणी आल्याने हा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे चिपळूण-कराड मार्ग ठप्प झाला आहे. परिणामी, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मार्ग बंद झाला असून मिरज, अक्कलकोट, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, लातूर या मार्गावरील एस.टी.ची वाहतूक ठप्प झाली आहे. कुंभार्ली घाटमार्गे जाणार्या सर्व एस.टी. गाड्या बंद असून ट्रकसह प्रवासी वाहतूक देखील बंद झाली आहे. याचा मोठा फटका बसणार आहे.