Ratnagiri News : चिपळुणातील जलजीवन योजनांनाच गळती

मुर्तवडे, वहाळ, निवळी, कळंबट, केरे, पिलवली तर्फे सावर्डेतील योजनांचा बोजवारा; चिखलयुक्त पाणी पिण्याची वेळ
Chiplun Jal Jeevan Mission
मुर्तवडे सुतारवाडी येथे पाणी योजनेसाठी खणलेला खड्डा धोकादायक ठरल्याने अखेर बुजवावा लागला.
Published on
Updated on

चिपळूण : जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांमध्ये मोठा आर्थिक घोळ होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही अनेक योजना अद्याप अर्धवट असल्याचा गंभीर मुद्दा जि. प. स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य शिवानी सावंत यांनी उपस्थित केला व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तालुक्यातील मुर्तवडे, वहाळ, निवळी, कळंबट, केरे आणि पिलवली तर्फे सावर्डे या गावांतील जलजीवन मिशनच्या योजना गेल्या चार वर्षांपासून सुरू असून, प्रत्यक्षात कामे अपूर्ण असतानाही मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सावंत यांनी उजेडात आणला आहे. त्यामुळे शासन निधीचा अपव्यय झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

नुकत्याच झालेल्या स्थायी समिती बैठकीत शिवानी सावंत यांनी या प्रकरणी चौकशीचा ठराव मांडत प्रशासनाला जाब विचारला. यापूर्वी गटविकास अधिकारी उमा घाडगे-पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत संबंधित योजनांची पाहणी केली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मुर्तवडे सुतारवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी ५१ लाख २१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी ४० लाख ७९ हजार रुपये वितरित झाले आहेत. मात्र अद्याप विहिरीचे काम पूर्ण झालेले नाही. विहिरीसाठी खोदण्यात आलेला खड्डा धोकादायक ठरत असल्याने तो बुजवावा लागला. दुसऱ्या पाणीटाकीचे प्लास्टरही पूर्ण झालेले नसतानाही पाणी कनेक्शन जोडण्याच्या सूचना देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी ग्रामस्थांना नदीतील चिखलयुक्त पाणी वापरण्याची वेळ आली आहे.

वहाळ येथील १ कोटी ३२ लाख रुपयांच्या योजनेपैकी ९७ लाख ६७ हजार खर्च झाले असूनही कामे अपूर्ण आहेत. निवळी येथील १ कोटी ३१ लाख रुपयांच्या योजनेत १ कोटी ६६ हजार रुपये अदा करण्यात आले असले तरी कामे रखडलेलीच आहेत. कळंबट येथील १ कोटी ३८ लाख ९५ हजार रुपयांच्या योजनेत १ कोटी १६ लाख ६५ हजार रुपये खर्चूनही योजना पूर्णत्वास गेली नाही. केरे गावच्या ६९ लाख ४६ हजार रुपयांच्या योजनेत ४१ लाख रुपये वितरित झाले आहेत, तर पिलवली तर्फे सावर्डे येथील तब्बल २ कोटी ४१ लाख रुपयांच्या योजनेत ९२ लाख रुपये खर्चूनही कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news