Ratnagiri News| बसेस कमी, प्रवासी जास्‍त; लालपरीवर येतोय ताण

रत्नागिरी विभागात १२५ गाड्यांची कमतरता; नवीन १५० ‌‘जिजाऊ‌’ बसेसची मागणी, जुन्‍याच बसेसमुळे संताप
ST Bus News
रत्नागिरी विभागात १२५ गाड्यांची कमतरता
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : रत्‍नागिरी विभागात मागील काही दिवसापासून अपुऱ्या बसेसमुळे पुन्‍हा एकदा वेळापत्रक कोलमडत आहे. एसटी विभागाच्‍या वतीने नवनवीन योजना, सवलत दिल्‍यामुळे प्रवासी पुन्‍हा लालपरीला पसंती देत गर्दी करीत आहेत मात्र प्रवाशांच्या तुलनेत रत्नागिरी विभागाकडे अपुऱ्या गाड्या असल्याने दैनंदिन सेवा देताना मोठी कसरत करावी लागत आहे. जुन्‍याच बसेसवर वाहतूक सुरू आहे. काही बसेस आल्‍यानंतर त्‍या भंगारात जात आहेत. रत्नागिरी विभागात तब्बल १२५ एसटी बसची कमतरता असल्याने अनेक मार्गांचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे.

रत्‍नागिरीपासून-मंडणगड, लांजा- राजापूरपर्यंतच्या रत्नागिरी विभागातील ग्रामीण भागात एसटीची वाहतूक सुरू आहे. वाड्या-वस्त्यांपर्यंत ‌‘लालपरी‌’ पोहोचली असून, ग्रामीण भागाची ‌‘जीवनवाहिनी‌’ म्हणून एसटीकडे पाहिले जाते. दररोज हजारो-लाखो प्रवासी एसटीच्या माध्यमातून जिल्‍हांतर्गत व लांब पल्‍ल्‍याचा प्रवास करतात. मात्र, उपलब्ध बसगाड्यांची संख्या कमी असल्याने त्याचा थेट परिणाम दैनंदिन वाहतुकीवर होत आहे. अपुऱ्या बसेस, बसेस वेळेवर येत नसल्‍यामुळे नाईलाजास्‍तव काही प्रवासी वडाप, चारचाकी, मिनी बसचा आधार घेवून रत्‍नागिरीसह अन्य तालुक्‍यात प्रवास करीत आहेत.

सन २०१९ मध्ये रत्नागिरी विभागातून ६९४ गाड्यांद्वारे प्रवासी वाहतूक करण्यात येत होती. मात्र, सध्या त्यापेक्षा कमी बस उपलब्ध असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. गाड्यांची संख्या कमी झाल्यामुळे दैनंदिन वेळापत्रकावरही त्याचा परिणाम झाला आहे. अनेक मार्गांवर बसफेऱ्यांचे नियोजन करताना विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

साखरपाला जाणाऱ्या प्रवाशांची होतेय गैरसोय

आंबा घाटातून दिवस एसटी बसेसची वाहतूक सुरू आहे. त्‍यामुळे दिवसभरातील सर्वबसेस आंबा घाटातून जातात. त्‍यामुळे साखरपाला जाणाऱ्या प्रवाशांची चिंता मिटली मात्र साडेसहा नंतर आंबा घाट बंद करण्यात आल्‍यामुळे रात्रीचे एसटी बसेस अणुस्‍कुरा घाटातून जात आहेत. त्‍यामुळे साखरपाला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. रात्री साखरपाला जाण्यासाठी बसेस नसल्‍यामुळे नाईलाजास्‍तव जास्‍तीचे पैसे देवून रिक्षा किंवा अन्य वाहनातून जावे लागत आहे.

१५० ‌‘जिजाऊ‌’ बसची मागणी

महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या राजमाता जिजाऊ बस अत्याधुनिक व प्रवाशांसाठी आरामदायी आहेत. या गाड्यांमध्ये प्रवाशांना आसनक्षमता अधिक असून, सामान्य एसटी बसच्या तुलनेत १६ जागा अधिक आहेत. त्यामुळे रत्नागिरी विभागाच्या ताफ्यात आणखी १५० जिजाऊ बस दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

२००हून अधिक बसेस स्‍क्रॅपमध्ये

केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार एसटीसह व्यावसायिक वाहनांचे आयुष्यमान १५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा निर्धारित किलोमीटर पूर्ण झाल्यावर गाड्यांचा मोडीत (स्क्रॅप) काढण्याचा नियम आहे. मागील काही महिन्‍यांमध्‍ये २०० हून अधिक बसेस भंगारात गेल्‍या आहेत. मात्र तितक्‍या प्रमाणात नवीन बसेस उपलब्‍ध झाल्‍या नाहीत. महामंडळाकडून या नियमानुसार गाड्यांचे आयुष्यमान संपल्यानंतर त्या ताफ्यातून कमी केल्या जातात. त्यामुळेही रत्नागिरी विभागातील उपलब्ध बससंख्येवर परिणाम झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news