

रत्नागिरी : रत्नागिरी विभागातून दररोज शहरी, मध्यम, लांब पल्ल्याच्या एसटी बसेस रस्त्यावर धावत असतात. दररोज हजारो, लाखोंच्या संख्येने लालपरीतून प्रवास करतात. मात्र शहरासह ग्रामीण भागातील एसटी बसेसमध्ये तालुक्याचा, गावाचा, जिल्ह्याचा उल्लेख असलेला फलक धुसर होत चालला आहे. विशेषत: जिल्ह्यांतर्गत बसेस, शहरी बससेवरील फलकावरील नावे धुसर झाली आहेत.
दिवसाबरोबर संध्याकाळी, रात्री फलक वाचता येत नाही. त्यामुळे वयोवृद्ध, ज्यांना चष्मा आहे तसेच चांगली दृष्टी असलेल्या प्रवाशांना फलक वाचणे कठीण झाले आहे. त्यामुळे कित्येक वेळा एसटी बस चुकते. त्यामुळे रत्नागिरी विभागातील एसटी बसेसवरील धुसर असलेले फलक बदलून मोठ्या अक्षरात असलेले ठळक दिसणारे नावोच फलक लावावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
रत्नगिरी विभागातून पहाटेपासून एसटी बसेस विविध मार्गावर धावतात. शहरी बसेस रत्नागिरी ते हातखंबा, रेल्वेस्टेशन व विविध गावात धावते. या बसेसवरील गावाच्या नावाचे फलक धुसर, अक्षर फिकट झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी, सामान्य प्रवाशांना वाचता येत नाही. तर दुसरीकडे जिल्ह्यांतर्गत राजापूर, लांजा, चिपळूण, रत्नागिरी, गुहागर, देवरूख, संगमेश्वर, दापोली, खेड तालुक्यात एसटी बसेस धावतात.
काही बसेसवरील नावाचे फलक चांगल्या पध्दतीने दिसते तर काही बसेसवर धुसर दिसत आहे. लालपरी लिहलेल्या नवीन बसेसवर ही पांढऱ्या अक्षराचे फलक आहे मात्र तेही धुसर दिसत आहे. काही वाहक तोंडाने गावाचे, तालुक्याचे नाव घेत आहेत. त्यामुळे कित्येक वेळा गाडी चुकते. लांबपल्याच्या एसटी बसेसमध्ये लाल रंगाच्या अक्षरात ठळक नावे दिसते, परंतु काही बसेवरील फलकावरील नावे दिसत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे शहर, ग्रामीण भागातील जिल्हांतर्ग बसेसवरील गाव, शहर, जिल्ह्याच्या नावांची फलक ठळक पद्धतीने नवीन बसवावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.