Ratnagiri News|‘ब्रिटिशकालीन' विशेष कारागृहाचा कायापालट होणार

उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून कोट्यवधींचा निधी मंजूर
Ratnagiri News
‘ब्रिटिशकालीन' विशेष कारागृहाचा कायापालट होणार
Published on
Updated on

​रत्नागिरी : स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रत्नागिरी येथील ब्रिटिशकालीन विशेष कारागृहाचे वैभव पुन्हा एकदा झळाळून उठणार आहे. राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी विशेष पाठपुरावा करून या कारागृहाच्या मजबुतीकरणासाठी आणि सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. सध्या या ऐतिहासिक वास्तूचे नूतनीकरण आणि संवर्धनाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच हे कारागृह एका नव्या आणि सुरक्षित रूपात पाहायला मिळेल.

या ब्रिटिशकालीन इमारतीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन तिच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता अत्याधुनिक पद्धतीने तिचे मजबुतीकरण करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून तब्बल ८ कोटी २४ लाख रुपयांहून अधिक रकमेची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, प्रत्यक्ष कामासाठी ५ कोटी ५२ लाखांहून अधिक रकमेची निविदा स्वीकारण्यात आली आहे. या कामाचा मुख्य उद्देश जुन्या इमारतीचे आयुष्य वाढवणे आणि कारागृहातील विविध विभागांमध्ये आधुनिक सोयीसुविधा निर्माण करणे हा आहे.

​सध्या सुरू असलेल्या कामांमध्ये कारागृहाच्या मुख्य इमारतीच्या दर्शनी भागाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. यामध्ये स्ट्रक्चरल स्टील वर्क, प्रीकोटेड शीट बसवणे आणि मंगलोर कौले लावून छताचे काम पूर्ण करण्यात आले आहे. इमारतीच्या भिंतींना स्टोन क्लॅडिंग करून एक आकर्षक लूक देण्यात आला आहे. याशिवाय, पुरुष व महिला कारागृह, अंडा सेल, स्वयंपाक गृह, दवाखाना आणि वॉच टॉवर यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये जुने प्लॅस्टर काढून नवीन प्लॅस्टर लावणे, जुन्या फरशा बदलून नवीन बसवणे आणि अंतर्गत व बाह्य रंगरंगोटीचे काम प्रगतिपथावर आहे.

​विशेष म्हणजे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या कोठडीत आपला काळ व्यतीत केला, त्या कोठडीचे नूतनीकरण आणि संवर्धनही या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या कोठडीचे डागडुजीकरण, सिलिंग आणि फोटो गॅलरीच्या नूतनीकरणाचे काम अत्यंत बारकाईने केले जात आहे. कारागृह अधिक्षकांच्या कार्यालयाचे नूतनीकरण आणि अंतर्गत फर्निचरची व्यवस्थाही यामध्ये समाविष्ट आहे.

​सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली हे काम सुरू असून, एम.एस. टेकनिर्माण इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला हे कंत्राट देण्यात आले आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झालेले हे काम पुढील २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या सांस्कृतिक सभागृह, मुलाखत कक्ष आणि संरक्षक भिंतींचे प्लॅस्टरिंग तसेच रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे या ऐतिहासिक वास्तूचे जतन होणार असल्याने रत्नागिरीकरांकडून समाधान व्यक्‍त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news