

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील राजीवडा समुद्रकिनारी नवीन मच्छीमार नौकेसह शेजारी असलेल्या बोलेरो पिकअपला आग लागली. बोलोरो पिकअप व्हॅन जळून खाक झाली. तर नौकेच्या मागचा किंवा शेपटचा भाग जळून गेला. रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने ही आग विझवली. मच्छीमार नौकेचे वेल्डिंगचे काम सुरू असताना शॉर्ट सर्किट होऊन उडालेल्या ठिणगीमुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
राजीवडा समुद्र किनारी भाट्ये पुलाखाली नवीन मच्छीमार नौकेच्या बांधणीचे काम सुरू होते. राजीवड्यातील जावेद वस्ता यांच्या मालकीची असलेल्या या लाकडी आणि फायबरच्या या बोटीमध्ये वेल्डींगचे काम सुरू होते. वल्डिंग सुरू असताना शॉर्टसर्किट होऊन त्याच्या ठिणग्या बोलेरो व्हॅनच्या दिशेने उडाल्या आणि मोठा स्फोट होऊन नौका आणि बोलेरो व्हॅन जळू लागल्या. आकाशात धुराचे लोळ उठल्यानंतर नौकेला आग लागल्याची बातमी पसरल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली.
आग लागल्याची माहिती रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला कळल्यानंतर अग्निशमन अधिकारी महेश साळवी, जवान नरेश मोहिते, शिवम शिवलकर, देवदास गावडे, संकेत विलणकर, अनिस तोडणकर, अमोल तळेकर, परेश सावंत, चंदावले अग्निशमन बंबासह घटनास्थळी दाखल झाले. रविवारी दुपारी लागलेली ही आग रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने विझवली असली तरी बोलेरो पिकअप व्हॅन पूर्णपणे जळून गेली आहे. नौकेच्या शेपटाचा किंवा मागचा भाग जळून गेला. बोलेरो व्हॅनमध्ये रासायनिक पदार्थ असावेत. तसेच नौकेच्या फायबरच्या सुट्या भागांमुळे आणि समुद्र किनारच्या जोरदार वार्यामुळे आग भडकून धुराचे लोळ उठल्याचे सांगितले जात आहे. नक्की आग कशामुळे लागली याचा शोध त्या परिसरातील सीसीटीव्हीतील चित्रिकरण पाहून केले जात आहे.