

रत्नागिरी ः भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू केले आहेत. त्यामध्ये आता जिल्ह्यातील ग्रामीण भागांचे पक्षीय कामकाज पाहण्यासाठी नूतन सुसज्ज पक्ष कार्यालयाची भर पडणार आहे. रत्नागिरी रेल्वेस्टेशन जवळ जिल्ह्यातील ग्रामीण भागांचे संघटन हाताळणाऱ्या पक्षाच्या जिल्हा कार्यालयाचा लवकरच शुभारंभ होणार आहे. त्यामुळे आता रत्नागिरीत भाजपची जिल्हा आणि शहर अशी दोन कार्यालये कार्यरत होणार आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषदांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांपूर्वी भाजपच्या सदस्यांची संख्या फारच कमी होती. पक्षाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर आमदार रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना-भाजप युती अभेद्य रहावी, या दिशेने पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांना सुचना केल्या. जिल्ह्यात शिवसेना मजबूत असल्याने युती करताना अधिक जागांवरून गडबड होऊ नये, यासाठी दक्षता घेतली. त्याचबरोबर पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सार्वजनिक हिताचे सामूहिक कार्यक्रम करण्यासाठी लागणारी आवश्यक ती सर्व ताकद दिली. त्याचाच परिणाम म्हणून आता नगर परिषदांपासून जिल्हा परिषदेपर्यंत सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत.
रत्नागिरीतील आठवडा बाजार येथे भाजपचे जिल्हा कार्यालय आहे. येथूनच रत्नागिरी शहर आणि जिल्ह्याचा पक्षीय कारभार चालतो. रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील पक्षाचे नुतन कार्यालय झाल्यानंतर जुने जिल्हा कार्यालय शहर कार्यालय म्हणून कार्यरत होणार आहे. नवीन कार्यालयामधून जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा गाडा हाकला जाणार आहे. नवीन जिल्हा कार्यालय हे 2400 स्वे. फूटचे असून तेथे पार्किंगसह पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांना स्वतंत्र दालन आहे. पार्किंग व्यवस्थेसह 4 स्वतंत्र सूट असून येथे जिल्हा बाहेरून येणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था होणार आहे. आता फर्निचरचे काम अंतिम टप्प्यात असून हे काम झाल्यानंतर या कार्यालयाच्या शुभारंभाची तारीख निश्चित होणार आहे.