रत्नागिरी : शहरातील मांडवी परिसरात भटक्या गुरांच्या झुंजीत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विजय तुकाराम कळंबटे (४३, रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) असे गंभीर जखमी दुचाकीचालकाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी शहरातील गजबजलेल्या मांडवी नाका परिसरातील रस्त्यावर दोन मोकाट गुरांची झुंज लागली. त्यावेळी विजय कळंबटे दुचाकीवरून जात होते. यावेळी झुंजणाऱ्या गुरांची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. त्यामुळे विजय दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.