

खेड : सतत वर्दळीचा आणि रिक्षा व्यावसायिक व पादचार्यांसाठी सोयीचा ठरलेला भोस्ते जगबुडी पूल धोकादायक अवस्थेत असून दुरुस्तीचा प्रस्ताव गेली पाच वर्षे लालफितीत अडकून बसला आहे. पुलावरुन होणार्या अवजड वाहतुकीमुळे वाहनचालक व पादचारी यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. दरम्यान, चिपळूण तालुक्यातील पिंपळी नदीवरील पूल कोसळल्यानंतर भोस्ते पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भोस्ते जगबुडी पूल हा शहरवासियांसह भोस्ते, अलसुरे, कोडिवली, निळीक, वेसे आदी गावांसाठी महत्त्वाचा दुवा आहे. विद्यार्थ्यांपासून वाहतूकदारांपर्यंत सर्वांच्याच दैनंदिन प्रवासासाठी हा पूल उपयोगी पडतो. पाचही पुलांपैकी हा पूल शॉर्टकटसाठी वाहतूकदारांकडूनही मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. दरम्यान, पुरस्थितीत जगबुडी नदीचे पाणी पुलाच्या तळाशी धडकत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण होते. पाच वर्षांपूर्वी पुलाच्या मध्यभागी मोठा तडा गेला होता. त्यावेळी तात्पुरत्या मलमपट्टीतून दुरुस्ती करण्यात आली होती. त्याच काळात जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला होता. मात्र, पाच वर्ष उलटूनही हा प्रस्ताव आजही लालफितीत अडकला असून प्रशासनाने पुलाची पाहणी करण्याची तसदीही घेतलेली नाही.
नगर प्रशासनाने अवजड वाहनांना पुलावरील प्रवेशबंदीचे फलक लावले होते, परंतु दंडात्मक कारवाई न केल्यामुळे आजही पुलावर अवजड वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पुलाची अवस्था गंभीर होत चालली आहे. पुलावर पथदीप लावण्यात आले असले तरी ते बहुतेक वेळा बंदच असतात. चार दिवसांपूर्वीच 13 गावांसाठी जीवनवाहिनी ठरलेला पिंपळी नदीवरील पूल कोसळून संपर्क तुटला आहे. त्यामुळे अशीच दुर्घटना होईपर्यंत प्रशासन भोस्ते पुलाच्या दुरुस्तीला हात घालणार नाही का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. महामार्गावरील दुर्घटनांनंतर पर्यायी मार्गासाठी भोस्ते पूल महत्त्वाचा ठरत असल्याने त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी होत आहे.