

रत्नागिरी : भाट्ये खाडीच्या मुखाशी येणारा गाळ रोखण्यासाठी भाट्ये पुलापासून मांडवीच्या दिशेने मोठा बंधारा बांधण्याचे काम सुरु झाले आहे. या बंधार्याचे काम दोन वर्ष सुरु राहणार आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर येथील गाळ काढण्याच्या कामालाही सुरुवात होत आहे.
मागील अनेक वर्षापासून भाट्ये खाडीच्या मुखाशी मोठ्याप्रमाणात गाळ साचला आहे. पावसाळ्यात लाटांसोबत दरवर्षी मोठ्याप्रमाणात गाळ येत असल्याने खाडीतून समुद्राकडे जाणार्या भागाची खोली कमी झाली आहे. मांडवीच्या दिशेने फक्त चॅनल उरल्याने याठिकाणाहून ओहटीच्यावेळी छोट्या नौका खाडीत येतजात असतात. तर मोठ्या नौकांना भरतीच्या पाण्याची प्रतिक्षा करावी लागते. हा प्रश्न कायम स्वरुपी सुटावा यासाठी राजिवडा, कर्ला, भाट्ये, नवा फणसोप या भागातील मच्छीमार प्रयत्नशील होते. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत व मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सुमारे 95 कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे.
याठिकाणी आता बंधारा बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. निर्माण टेक कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरु आहे. भाट्ये पुलाला लागूनच या बंधार्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुलाच्या भाट्ये येथील भरावाकडून पिचिंग करण्यात आले असून त्यानंतर समुद्राच्या दिशेने बंधार्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
बंधारा मजबूत व्हावा यासाठी टेट्रापॉटही याच ठिकाणी तयार केले जात असून, दगडी बंधार्यावर सुरक्षेसाठी हे टेट्रापॉट बसवले जाणार आहेत. बंधारा पूर्ण झाल्यानंतर खाडीत येणारा गाळ थांबण्यास मदत होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान गाळ काढण्याचे काम आता पावसाळ्यानंतर सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली.