

गुहागर शहर : गुहागरात पावसाचा जोर सोमवारी (दि. 16) देखील कायम राहिल्याने अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडले. भातगाव वडाचीवाडी येथे जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर दरड कोसळल्याने येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अखेर प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने दरड बाजूला करून येथील मार्ग मोकळा केला. शाळेच्या पहिल्याच दिवशी सकाळची एस.टी. बस दरडीमुळे अडकली. यामुळे विद्यार्थीदेखील अडकून पडले होते.
तालुक्यातील भातगाव मराठवाडी, बौद्धवाडी, गुरववाडी या वाड्यांकडे जाणार्या रस्त्यावर दरड कोसळली तर काताळे मेनरोड ते नवानगर रस्त्यावर झाड कोसळले. प्रशासनानेही वरदरड बाजूला करून रस्ता मोकळा केला. जानवळे येथील मुकेश जानवळकर यांच्या घरावर झाड पडून पत्रे तुटले. वेळणेश्वर येथील मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर झाड पडल्याने रस्ता बंद होता हे झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. परचुरी भुवडवाडी येथे शांताराम वेद्रे यांच्या घराच्या पडवीवर सुपारीचे झाड पडून पडवीचे नुकसान झाले. अडूर येथील संजय गुरव यांच्या घराची पावसामुळे पडझड झाली आहे. मौजे पेठ अंजनवेल येथे एकनाथ सैतवडेकर यांच्या घराच्या पडवीचे वादळी पावसाने नुकसान झाले आहे. तर मौजे जांभारी येथे कुशल निमकर यांच्या घरावर पावसामुळे झाड पडल्याने घराचे पडल्याने नुकसान झाले आहे.