

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील गोगटे -जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागामार्फत रत्नागिरीजवळील भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील समुद्री शैवाळांचे संकलन करण्यात आले. या संकलित शेवाळापासून येत्या काही दिवसांतच जैविक खत निर्मिती केली जाणार आहे.
समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात समुद्री शेवाळांचा ढीग जमा झालेला दिसतो. डिसेंबर ते मार्च हा समुद्रीशेवाळांच्या वाढीचा काळ असल्यामुळे या दिवसात समुद्राच्या लाटांबरोबर मोठ्या प्रमाणात शेवाळांंचे ढीग समुद्रकिनाऱ्यावर फेकले जातात. यात प्रामुख्याने तपकिरी रंगाची समुद्री शेवाळ आढळते. या टाकाऊ समुद्री कचऱ्यात नत्र, स्फुरद, पालाश यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे यापासून जैविक खत सहजरित्या तयार केले जाऊ शकते. हेच महत्व जाणून वनस्पतीशास्त्र विभागाअंतर्गत भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील समुद्री शेवाळांचे संकलन करण्यात आले. यात प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
वनस्पतीशास्त्र विभागातील समुद्री शेवाळ अभ्यास डॉ. विराज चाबके यांनी विद्यार्थ्यांना समुद्री शेवाळांची माहिती दिली. सामुदायिक सहभागीता कार्यक्रम अंतर्गत या संकलनाचे आयोजन करण्यात आले होते. संकलित शेवाळापासून येत्या काही दिवसातच जैविक खत निर्मिती केली जाणार आहे. विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांनी नियोजन केले. यासाठी प्रा. परेश गुरव यांनी विशेष मेहनत घेतली.