Bauxite Project | बॉक्साईट प्रकल्प सुनावणी होणार नाही’; पालकमंत्री उदय सामंत यांचा शब्द!

सागवे येथे संघर्ष मेळावा; ७ सप्टेंबरची जनसुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट
Bauxite Project | बॉक्साईट प्रकल्प सुनावणी होणार नाही’; पालकमंत्री उदय सामंत यांचा शब्द!
Bauxite Project | बॉक्साईट प्रकल्प सुनावणी होणार नाही’; पालकमंत्री उदय सामंत यांचा शब्द!
Published on
Updated on

रत्‍नागिरी : सागवे परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट खनिज उत्खनन प्रकल्पाच्या विरोधात सागवे हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या संघर्ष मेळाव्यात मच्छीमार, शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी नियोजित असलेली बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार नाही, असे स्पष्ट आश्वासन उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्याने मेळाव्यातील वातावरण निर्णायक बनले.

या वेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, “आपल्या जिल्ह्यावर संकट येणार नाही, याची खात्री तुम्हाला असायला हवी. आमदार म्हणून जनतेचा विरोध म्हणजे माझा विरोध, ही भूमिका किरण सामंत यांनी मांडली आहे. पालकमंत्री म्हणून मी शासनाची भूमिका मांडण्यासाठी आलो आहे. ७ तारखेची जनसुनावणी होणार नाही.”

“एखाद्या प्रकल्पासाठी संघर्ष करण्याची वेळ भविष्यात कोणावरही येणार नाही, हा माझा शब्द आहे. जबरदस्तीने कुठेही काही होणार नाही. जनतेला जे हवे आहे, ते करण्याची आमची आणि सरकारची भूमिका आहे. मी सरकारमध्ये असलो तरी जनतेशी बांधील आहे. आम्हीही याच मातीतले आहोत. त्यामुळे कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही,” असे सामंत यांनी ठामपणे सांगितले.

२००० कोटींच्या प्रकल्पांचे स्वागत केले म्हणून बॉक्साईट प्रकल्पाचेही स्वागत करू, असे नाही, असे स्पष्ट करत सामंत यांनी कोकणच्या निसर्गाचे नुकसान करणाऱ्या प्रकल्पांबाबत सावध भूमिका घेतली. “उगाच आगाऊपणा करून कोकणाचे निसर्गसौंदर्य खराब करू नका,” असा इशाराही त्यांनी दिला. बचत गटांच्या माध्यमातून काजू बोंडापासून सिरप निर्मितीसारख्या स्थानिक आणि शाश्वत उद्योगांना चालना देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच ‘लाडकी बहीण’ योजना बंद होऊ देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार किरण सामंत यांनी संघर्ष मेळाव्याला यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. “शिट्टी वाजण्यापूर्वी पळू नका. प्रत्येक काम लगेच झाले पाहिजे, अशी अपेक्षा करू नका. आमदार म्हणजे झेरॉक्स मशीन नाही. काही गोष्टी टप्प्याटप्प्याने कराव्या लागतात; मात्र यश नक्की मिळेल,” असे ते म्हणाले.

मेळाव्यात मजीद भाटकर यांनी मच्छीमारांनी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले. शपथपत्र केल्यानंतर मच्छीमार समाज एकदिलाने या संघर्षात सहभागी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मच्छीमार आणि शेतकरी ताकदीने एकत्र उभे राहून हा लढा देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

सुबोध मांजरेकर यांनी राजापूरच्या जनतेला सातत्याने संघर्ष का करावा लागतो, असा सवाल उपस्थित केला. “राजापूर तालुका संघर्षासाठीच आहे का? आम्ही काय फक्त विरोधच करत राहायचे? संघर्ष करण्यासाठीच येथील जनतेचा जन्म झाला आहे का? प्रत्येक वेळी आमच्या अस्तित्वासाठी किती वर्षे संघर्ष करायचा?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.

कमलाकर कदम यांनी संघर्ष मेळाव्याची गरजच पडू नये, अशी अपेक्षा व्यक्त करत आमदारांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. “पक्ष बाजूला ठेवून आपण संघर्ष करूया आणि बॉक्साईट प्रकल्प घालवूया. दोन सामंत बंधूंचे खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी आहे. जनतेच्या हिताचे प्रकल्प आणले असते तर त्यांचे नक्कीच स्वागत केले असते,” असे त्यांनी सांगितले.

काशिनाथ गोरले यांनी कोकण वाचवण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. “आम्हाला संघर्ष नको म्हणून दोन सामंत बंधू आणि दोन राणेंना आम्ही निवडून दिले. आम्हाला शाश्वत विकासाचे प्रकल्प हवेत. आदिवासी होऊन जगणे परवडेल; मात्र विनाशकारी प्रकल्प नकोत. फक्त आज शब्द द्या—बॉक्साईट होणार नाही!” असे आवाहन त्यांनी केले. जनसुनावणीचा प्रयत्न झाल्यास सर्व संघटना एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.

ओंकार प्रभुदेसाई, सरपंच, नाणार यांनी नाणार परिसरातील नैसर्गिक व सांस्कृतिक संपदेचा संदर्भ देत १४४ हेक्टर क्षेत्र, कातळशिल्पे आणि आंबा उत्पादनातून होणाऱ्या सुमारे ३०० कोटी रुपयांच्या उलाढालीकडे लक्ष वेधले. ही शाश्वत आर्थिक उलाढाल असून अशा स्थानिक अर्थव्यवस्थेचे संरक्षण झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

नंदकुमार कुलकर्णी, वासुदेव मासये, दीपक नागले, सोनाली ठिकरूळ, रवींद्र अवसरे, मनोहर धुरी, विनेश वालम, संजय राणे आदींनीही मनोगत व्यक्त करत बॉक्साईट प्रकल्पाला विरोध दर्शविला. जनसुनावणीपूर्वी जनतेची भूमिका जाणून घेण्यासाठी पुढाकार घेणारे आमदार किरण सामंत हे पहिले आमदार असल्याचे नमूद करत राजापूरमधील प्रत्येक प्रकल्पाला जनता विरोध करते, हा गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचेही वक्त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक ॲड. शशिकांत सुतार यांनी केले. मेळाव्याला मच्छीमार, शेतकरी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बॉक्साईट प्रकल्पाच्या विरोधात पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा सूर संपूर्ण मेळाव्यात उमटला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news