

मुंबई : महाराष्ट्रातील अणुऊर्जानिर्मितीसाठी राज्य सरकारने मंगळवारी चार कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले. तब्बल साडेसहा लाख कोटी रुपयांच्या या गुंतवणुकीसह २५ हजार ४०० मेगावॅट अणुऊर्जेची निर्मिती आणि १ लाख २३ हजार ५०० रोजगार यातून निर्माण होणार आहेत. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू, पूर्णगड तसेच सिंधुदुर्गातील देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीला गती मिळणार आहे.
मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एनटीपीसीएल, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या चार कंपन्यांसोबत हे करार करण्यात आले. यावेळी पारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, एनटीपीसी लिमिटेडचे मुख्य महाव्यवस्थापक ए. पी. सामल, अदानी पॉवर कंपनीचे बिझनेस हेड विवेक शर्मा, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या न्यूक्लिअर एनर्जी बिझनेसचे अध्यक्ष रंजय शरण आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला संपन्न ऊर्जा राष्ट्र तसेच शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी महाराष्ट्र सर्व प्रयत्न करीत आहे. स्वच्छ ऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे. ही गुंतवणूक केवळ ऊर्जानिर्मितीसाठीच लाभाची नसून, त्यामुळे रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. सरकार त्यांना सहकार्र करत आहे. स्वच्छ ऊर्जानिर्मितीमध्ये महाराष्ट्र नेहमी देशात अग्रेसर असणार आहे. करार झालेले प्रकल्प लवकर सुरू व्हावेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड ही राज्यात २ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.