

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील आठवडा बाजाराच्या मागील बाजूस पाण्याच्या टाकीजवळ ब्राऊन हेरॉईन या अमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शिव कुमार चौधरी ऊर्फ शिव बहादूर सोनार (३२, सध्या रा. पांढरा समुद्र मुरुगवाडा, जि. रत्नागिरी, मूळ रा. साडेपानी, जि. कैलाली, नेपाळ) आणि दुर्गा जीत बहादूर (३१, सध्या रा. पांढरा समुद्र मुरुगवाडा, जि. रत्नागिरी, मूळ रा. वॉर्ड क्र. ४, घोडाघोडी, कैलाली, नेपाळ) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई १८ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार अमित अशोक कदम आणि पोलिस पथक रत्नागिरी शहर परिसरात शासकीय वाहनातून गस्त घालत होते. यावेळी आठवडा बाजाराच्या मागील बाजूस पाण्याच्या टाकीजवळ शिव कुमार चौधरी ऊर्फ शिव बहादूर सोनार संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ब्राऊन हेरॉईन आढळून आले.
पोलिसांनी जप्त केलेल्या अमली पदार्थाचे प्लास्टिक पिशवीसह वजन ७ ग्रॅम असून, त्याची किंमत १ लाख २१ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा अमली पदार्थ २४२ पुड्यांमध्ये ठेवण्यात आला होता. प्रत्येक पुडीची किंमत ५०० रुपये असल्याचे पोलिसांच्या कारवाईत स्पष्ट झाले. याशिवाय अमली पदार्थ ठेवण्यासाठी वापरलेली भगव्या रंगाची प्लास्टिक पिशवी आणि पुड्या बांधण्यासाठी वापरलेले २४२ कागदाचे तुकडेही जप्त करण्यात आले.पोलिसांनी १५ हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३५९/२०२६ नुसार एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८ (क), २१ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.