

रत्नागिरी : मांजर हरवल्याच्या किरकोळ कारणावरून रत्नागिरी तालुक्यातील आरे येथे दोन कुटुंबांत परस्परांना मारहाण झाली. शिवीगाळीपासून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाले. दगड, काठी, लादी आणि कटर ब्लेडचा वापर करत एकमेकांवर हल्ले करण्यात आले. या घटनेत चौघे जखमी झाले असून, परस्पर तक्रारींवरून रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रसाद प्रकाश कदम (३७, रा. कदमवाडी, आरे) यांच्या फिर्यादीनुसार, ते पत्नी पूर्वा यांच्यासोबत घराबाहेर मांजर हरवल्याबाबत चर्चा करत होते. त्यावेळी दीपाली कदम यांनी त्यांचे बोलणे ऐकून शिवीगाळ करत ‘तुमचे मांजर आम्ही मारले का?’ अशी विचारणा केली. त्यानंतर अन्य सदस्यही घराबाहेर आले आणि शब्दाला शब्द वाढत जावून वादाला सुरुवात झाली.
कदम कुटुंबीय तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्याकडे जात असताना कदमवाडी चव्हाट्याजवळ मयुरेश आरेकर व त्याचे कामगार पाखाडीची साफसफाई करत होते. कामगाराचा धक्का पूर्वा कदम यांना लागल्याने पंकज कदम यांनी विचारणा केली. त्यावरून पुन्हा वाद पेटला. मयुरेश आरेकर याने प्रसाद कदम यांना शिवीगाळ करून कटर ब्लेडने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यानंतर पाखाडीवर जमाव जमवून कदम कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. प्रसाद कदम यांच्या कपाळाजवळ दगड मारण्यात आला, तर पूर्वा कदम यांच्या ढोपरावर काठीने मारहाण करण्यात आली. कालभैरव मंदिराजवळ वाहनाकडे जात असताना पंकज कदम यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. प्रसाद यांच्या डोक्यावर व नाकावर बुक्क्यांनी मारल्याचा, तर पूर्वा यांच्या नाकावर बुक्क्याने व पायावर लाथेने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत आहे. या हाणामारीत प्रसाद प्रकाश कदम, पूर्वा प्रसाद कदम, पंकज प्रकाश कदम आणि प्रतिक्षा प्रकाश कदम हे चौघे जखमी झाले. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार परस्पर गुन्हे दाखल केले आहेत. बेकायदेशीर जमाव, मारहाण, दुखापत आणि धमकीच्या आरोपांखाली १४ जणांवर कारवाई करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
भांडण सोडवणाऱ्या महिलेलाही मारहाण
दरम्यान, याच घटनेप्रकरणी अस्मिता आनंद पेडणेकर (वय ५०, रा. आरे मयेकरवाडी) यांनीही पोलिसांत फिर्याद दिली आहे. कालभैरव मंदिराजवळ सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता प्रसाद व पंकज कदम यांनी शिवीगाळ करून छातीवर व हातावर मारहाण केली तसेच डोक्यावरही मारल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. दुर्वांक कदम याने काठीने मारहाण केली, तर रक्षंदा पंकज कदम यांनी धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेत पेडणेकर जखमी झाल्या.