

नाटे : राजापूर तालुक्यातील नाटे गावाजवळ असलेल्या ऐतिहासिक घेरा यशवंतगड किल्ल्याच्या डागडुजी व दुरुस्तीच्या कामादरम्यान एक भिंत पावसाळ्याच्या पहिल्याच सरीत कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थ व शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुरातत्त्व विभाग व ठेकेदार यांच्यावर निकृष्ट दर्जाच्या कामाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या डागडुजीसाठी एकूण 8 कोटी 19 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, सध्या किल्ल्यावर पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून काम सुरू आहे. मात्र, काम सुरू असतानाच भिंत कोसळल्यामुळे कामाच्या दर्जावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर राजापूरचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी आज घेरा यशवंतगडला भेट देऊन संपूर्ण बांधकामाची पाहणी केली. त्यांच्यासोबत तहसीलदार विकास गमरे, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, ठेकेदार व अन्य अधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान, आमदार सामंत यांच्या समोरच शिवप्रेमी व ग्रामस्थांनी ठेकेदार व पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांना जाब विचारला. त्यांनी केलेल्या कामाचे स्वरूप, दर्जा आणि पारदर्शकता यावर कठोर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
घटनास्थळी उपस्थित असलेले अनेक शिवप्रेमी व ग्रामस्थ हे काम निकृष्ट पद्धतीने केल्याचा ठपका पुरातत्व विभागावर ठेवत होते. त्यांचा रोष आणि भावना लक्षात घेत भविष्यातील काम अधिक पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठी स्थानिक सहभाग अत्यावश्यक असल्याचे चित्र यावेळी स्पष्ट झाले. या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि जतन हे केवळ सरकारी काम नव्हे, तर लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे यासंदर्भात जागरूकता, सहभाग आणि पारद र्शकता हाच पुढील वाटचालीचा मूलमंत्र ठरणार आहे.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत आमदार सामंत यांनी स्थानिक पातळीवरील 5 जणांची एक कमिटी स्थापन करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. या कमिटीमध्ये नाटे आणि साखरी नाटे या दोन्ही गावच्या सरपंचांचा समावेश असेल तर अन्य तिघांना या कमिटीमध्ये घेण्यात येणार असून या कमिटीच्या माध्यमातून स्थानिकांचे मत, देखरेख आणि सहभाग मिळवून बांधकाम दर्जेदार व पारदर्शक ठेवले जाईल, अशी खात्री त्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित असलेल्या या किल्ल्याचे पुनरुत्थान अतिशय दर्जेदार आणि आदराने व्हावे, यासाठी आपण जातीने लक्ष ठेवणार आहोत. मात्र, या प्रकरणात कोणताही राजकारणाचा अंश नको, असा इशारा आमदार सामंत यांनी यावेळी दिला.