Ratnagiri News : आंबिया बहार योजनेत सहभागी व्हा

आंबा, काजू या दोन पिकांचा समावेश; 4 हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येणार
Ratnagiri News
आंबिया बहार योजना
Published on
Updated on

रत्नागिरी : 2025-26 मध्ये आंबिया बहार योजनेमध्ये सहभागाकरिता विमा पोर्टल सुरू झाले असून, अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट या हवामान धोक्यापासून फळबागांचे संरक्षण करण्यासाठी निर्धारित केलेल्या कालावधीत या योजनेत शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे. आंबा, काजू या दोन पिकांचा समावेश असून 0.10 हेक्टर ते जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्रांवर विमा नोंदणी करता येणार आहे. 1 डिसेंबर 2025 ते 15 मे 2026 पर्यंत विम्याचे संरक्षण असणार आहे.

जिल्ह्यात अधिसूचित केलेल्या 83 महसूल मंडळात आंबा व काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येते. आंबा, काजू फळपीक वय 5 वर्ष, कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकर्‍यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही ही योजना लागू राहील. मात्र भाडेपट्टीने शेती करणार्‍यास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. कर्जदार शेतकर्‍यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसल्यास त्याबाबतचे घोषणापत्र सहभाग नोंदवण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर संबंधित बँकेत देणे आवश्यक आहे. संबंधित बँकेसोबत संपर्क साधावा. एका शेतकर्‍यास अधिसूचित फळपिकांसाठी 0.10 हे ते जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल. या योजनेचा विमा संरक्षित कालावधी हा 1 डिसेंबर 2025 ते 15 मे 2026 आहे.

आंबा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार रुपये व शेतकरी विमा हप्ता 13 हजार 600 रुपये प्रती हेक्टर आणि काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख 20 हजार रुपये व शेतकरी विमा हप्ता 6 हजार रुपये प्रती हेक्टर आहे. संभावित हवामान धोके महसूल मंडळनिहाय स्थापित केलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वारा वेग, आर्द्रता इत्यादी माहिती स्वयंचलितरित्या नोंदवली जाते. या माहितीच्या आधारे शासन निर्णयामध्ये निर्धारित केलेल्या कालावधीत हवामान धोके लागू झाल्यानंतर विमाधारक शेतकरी यांना नुकसान भरपाई लागू होते. जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लि. या कंपनीमार्फत योजना राबवण्यात येत आहे. योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर ही आहे.

आंबा पिकासाठी अवेळी पाऊस - 1 डिसेबर ते 31 मार्च, एक दिवशी 05 मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त. कमी तापमान - 1 एप्रिल ते 15 मे, एक दिवशी 10 मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त 1 जानेवारी ते 1 मार्च, सलग 3 दिवस 13 डिग्री से. किंवा त्यापेक्षा कमी. जास्त तापमान - 1 मार्च ते 15 मे - सलग 3 दिवस 37 डिग्री से. किंवा त्यापेक्षा जास्त. वेगाचा वारा 16 एप्रिल ते 15 मे- 25 कि. मी प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त (नुकसान, झाल्यास 72 तासांत विमा कंपनीस/कृषि विभागास तक्रार करणे आवश्यक) गारपीट - 1 फेबुवारी से 31 मे- गारपीट होऊन नुकसान झाल्यास 72 तासांत विमा कंपनीस, कृषी विभागास तक्रार करणे आवश्यक आहे.

काजू पिकासाठी अवेळी पाऊस - 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी एक दिवशी 5 मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त. कमी तापमान - 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी सलग 3 दिवस 13 डिग्री से. किंवा त्यापेक्षा कमी. गारपीट - 1 जानेवारी ते 30 एप्रिल गारपीट होऊन नुकसान झाल्यास 72 तासांत विमा कंपनीस कृषी विभागास तक्रार करणे आवश्यक. हवामानाची नोंद महसूल मंडळामधील स्थापित असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रावर झाल्यानंतर विमाधारक शेतकर्‍यांना विमा परतावा लागू होतो.

मुदतीपूर्वी फळपिकाचा विमा काढावा

अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहायक कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा. विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींशी संपर्क साधावा. तसेच शेतकर्‍यांनी अंतिम मुदतीच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी लवकरात लवकर आपल्या फळपिकांचा विमा काढून घ्यावा.

हे बंधनकारक असणार

विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अ‍ॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) असणे व ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अ‍ॅप्लिकेशनमध्ये फळपिकाची नोंद करणे या बाबी बंधनकारक आहेत. विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी), बँक तसेच संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावा. विमा अर्जासोबत फळबागेचा जीओ टॅगिंग असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील.

फळपिकांसाठी विमा पोर्टल सुरू झाले आहे. आंबा, काजू या दोन पिकांसाठी शेतकर्‍यांनी विमा नोंदणी वेळेत करावी. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी विमा नोंदणी करावी.
शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news