Amba Ghat project : आंबा घाटात भुयारी मार्ग; कागल-रत्नागिरी प्रवास एका तासात!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे डीपीआर तयार करण्याचे निर्देश; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
Amba Ghat project
आंबा घाटात भुयारी मार्ग; कागल-रत्नागिरी प्रवास एका तासात!
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबा घाटातील खडतर, वळणावळणाच्या प्रवासाला आता भुयारी मार्गाचा पर्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबा घाटात प्रस्तावित भुयारी मार्गासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ते रत्नागिरी हे अंतर अवघ्या एका तासात पार करता येईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमधील दळणवळणासाठी आंबा घाट हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, घाटातील नागमोडी वळणे, चढ-उतार आणि अरुंद रस्त्यामुळे प्रवासासाठी अधिक वेळ लागतो. पावसाळ्यात तर या मार्गावरील वाहतूक अधिक धोकादायक बनते. त्यामुळे आंबा घाटाला पर्यायी भुयारी मार्ग असावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.या मागणीच्या अनुषंगाने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. यावेळी आंबा घाटातील भुयारी मार्गाबाबत चर्चा झाली. त्यानंतर गडकरी यांनी या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या दृष्टीने प्रशासकीय हालचालींना सुरुवात झाली आहे.

औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आणि हातकणंगले परिसरात औद्योगिक विकास वेगाने होत आहे. या भागातील उद्योगांना विस्तारासाठी अधिक जागेची आवश्यकता भासत आहे. अशा वेळी रत्नागिरी जिल्हा हा उद्योगांसाठी पर्यायी संधी देणारा परिसर ठरू शकतो. कागल ते रत्नागिरी प्रवासाचा कालावधी एक तासावर आल्यास दोन्ही जिल्ह्यांतील औद्योगिक संबंध अधिक दृढ होतील. कच्चा माल, तयार उत्पादने आणि मालवाहतुकीसाठीही हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.

पर्यटन आणि व्यापारालाही फायदा

कोल्हापूरमधील पर्यटकांना कोकण किनारपट्टीवरील पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होईल. त्याचप्रमाणे रत्नागिरीतील आंबा, काजू, मासे आणि अन्य कृषी व मत्स्य उत्पादनांना पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठ अधिक सहज उपलब्ध होऊ शकेल. प्रवासाचा वेळ आणि इंधन खर्च कमी झाल्यास व्यापार, पर्यटन आणि स्थानिक रोजगारालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

डीपीआरनंतर प्रकल्पाचे चित्र स्पष्ट होणार

सध्या या भुयारी मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बोगद्याची लांबी, नेमका मार्ग, बांधकामाचा खर्च, तांत्रिक आराखडा आणि कामाची कालमर्यादा याबाबतचे चित्र डीपीआरनंतर स्पष्ट होणार आहे. प्रत्यक्ष बांधकाम आणि आवश्यक मंजुरींचे टप्पे पार पडल्यानंतरच प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळेल. मात्र, कागल ते रत्नागिरी हा प्रवास एका तासात करण्याच्या अपेक्षेने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.