Ratnagiri News : आंबा घाटाचा अहवाल आठ दिवसांत येणार!

भेगा ताडपत्रीने ठेवल्‍या झाकून; पुणे येथील एजन्‍सीकडून पाहणी, संरक्षक भिंतीचे काम अहवालानंतर
Ratnagiri News
आंबा घाटाचा अहवाल आठ दिवसांत येणार!
Published on
Updated on

रत्नागिरी : पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात रस्ता खचला आहे. तिथेच वरच्या भागात रस्त्याला गंभीर भेगा गेल्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने हा मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार यावर बारीक लक्ष ठेऊन आहे. या मार्गाच्या दुरूस्तीसाठी पुणे येथील एजन्सीने नुकतीच पाहणी करून तेथील माती परिक्षणासाठी नेली आहे. त्यावर अभ्यास करून कशा प्रकारे पुन्हा संरक्षक भिंत बांधता येईल, याबाबतचा अहवाल ही एजन्सी आठवडाभरात देणार आहे. त्यानंतर संरक्षक भिंतीचे काम सुरू होणार असल्याची माहिती संबंधित ठेकेदार कंपनीने दिली.

ज्या ठिकाणी आंबा घाटाचा रस्ता खचला आहे त्याठिकाणी १०० मीटर खोल दरी आहे. अचानक रस्ता खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी 12 ऑगस्‍टपासून आंबा घाटातून जाणारी एसटी, प्रवासी बसेस आणि सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ठिकाणी यापूर्वी खचलेल्या रस्त्याला संरक्षण मिळावे, म्हणून संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. ती भिंत खचल्याने वरचा भाग घसरला आहे. आता संरक्षक भिंत बांधलेल्या रस्त्याच्या भागाला देखील भेगा गेल्या आहेत. त्यामध्ये पाणी जाऊन तो भाग पुन्हा खचू नये यासाठी ताडपत्रीने तो झाकून ठेवला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीने पुण्यातील एका एजन्सीला अभ्यासासाठी बोलावले होते. एजन्सीने घाटातील खचलेल्या भागाची पूर्ण पहाणी केली. तेथील मातीचे नमुने घेतले असून त्यावर अभ्यास सुरू केला आहे. भविष्यात हा भाग खचू नये, यासाठी कोणत्या प्रकारे संरक्षक भिंत बांधता येईल किंवा अन्य काय पर्याय असेल, हे ही एजन्सी सुचवणार आहे. त्याचा आराखडा तयार करून आठवडाभरात एजन्सी अहवाल देणार आहे. त्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे.

व्‍यापार्‍यांना फटका

वाहतूक अणुस्कुरा मार्गाने वळवण्यात आल्याने एसटी प्रवाशांना मोठा भुर्दंड प्रवाशांना सोसावा लागत आहे. यामुळे रत्नागिरी-कोल्हापूर तिकीट दरामध्ये सुमारे १०० ते ११० रुपयाची वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांचे ट्रक देखील या मार्गे येत असल्याने ४५ किमीची वाढ झाली आहे. प्रवासाच्‍या वेळेमध्‍येही वाढ झाली आहे. त्याचा फटका देखील व्यापाऱ्यांना बसत असून रत्‍नागिरीत अन्न धान्य, भाजीपाल्यांची दरवाढ होऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news